ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक भत्ता द्यावा: पुरोगामी युवक संघटनेची मागणी

कोल्हापूर | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी आणि युवक संघटनेच्या वतीने कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या झालेल्या खर्चासाठी विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक भत्ता मिळण्याची मागणी करण्यात आली. विधानपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेतील अर्ज प्रक्रियेत जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी व्यस्त असल्याने सदर मागाणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार सुनिता नेर्लीकर – क्षीरसागर यांना देण्यात आले.

गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. ग्रामीण आणि डोंगराळ भागात तांत्रिक अडचणी (netwrok issue & load shedding) मुळे ऑनलाईन क्लासेस ची अंमलबजावणी प्रभाविपणे होऊ शकलेली नाही. बऱ्याच सर्वासामान्य गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक परिस्थितीमुळे 3G/4G मोबाईल च्या आभावामुळे तसेच मोबाईल रिचार्जच्या खर्चामुळे शिक्षणासाठी आर्थिक बोजा सोसावा लागलाआहे.
कोरोना काळातील लॉकडाउन मुळे बुडालेले रोजगार आणि उद्योगधंदे यामुळे सर्वांवर मार्च 2020 पासून आर्थिक अरिष्ठ कोसळले आहे. अशातच ऑनलाईन शिक्षणामुळे सर्व विद्यार्थ्यांना अतिरिक्त आर्थिक खर्च सोसावा लागला आहे. सदरच्या झालेल्या अतिरिक्त शैक्षणिक खर्चाची जबाबदारी शासनाने घेऊन विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक भत्ता देण्यात यावा. यामध्ये मोबाईल रिचार्ज च्या प्रतिमहिन्याच्या खर्चाची किमान 300/- रुपये याप्रमाणे गेल्या दिड वर्षातील रुपये 5400/- इतकी रक्कम शासनाने तात्काळ सर्व विद्यार्थ्यांना द्यावी अशी मागणी करण्यात आली. सदर रकमेचे वाटप पारदर्शकपणे करून प्राथमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना कोणतेही आर्थिक निकष न लावता तसेच सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करावी अशी मागणी महाराष्ट्रातून सर्व प्रथम शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी आणि युवक संघटना कोल्हापूर च्या वतीने करण्यात आली.
यावेळी भाई चंद्रशेखर नलावडे-पाटील, अभिजीत कदम, नंदकिशोर पडवळे, सूर्यकांत सोनुले, सिद्धार्थ दीक्षित, दत्तात्रय पाटील, अनुप कदम, हर्षद कदम इत्यादी उपस्थित होते.

Exit mobile version