। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्रीवर्धन व विनर्स जॉय ऑफ गिविंग या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मेडिटेशन व करिअरच्या संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी विवेक मुगळेकर, संस्थेचे प्रमुख राहुल माने, राकेश म्हात्रे, रीमा माने व अन्य सदस्य उपस्थित होते.
वाढता हिंसाचार, व्याभिचार, अशांतता, लैंगिक शोषण, जीवनाकडे पाहण्याची नकारात्मक दृष्टी व वाढता चंगळवाद यामुळे जीवनाची नैतिक मूल्यांचे अवमूल्यन होत आहे, अशी खंत प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केली.
विद्यार्थी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मेडिटेशनशिवाय पर्याय नाही त्यासाठी या विद्यार्थी दशेतच करिअरच्या संधी व अचूक निर्णय घेतले पाहिजेत, अशी भावना राहुल माने यांनी व्यक्त केली.
श्रीवर्धन पोलीस उपविभागाचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी विवेक मुगळेकर यांना सन 2017 मध्ये राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी करिअरच्या अचूक संधी निवडून आपल्या कामाची निष्ठा व प्रामाणिकपणा ठेवून अध्ययन व अध्यापन केले पाहिजे, तर भावी जीवनाची वाटचाल सुखकर होईल, असे विचार विवेक मुगळेकर यांनी मांडले.
श्रीवर्धन तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रथमेश भुरके यांनीही कठोर परिश्रमाशिवाय यश संपादन करता येत नाही. त्यासाठी आपण कामावर प्रामाणिकपणे प्रेम व निष्ठा ठेवावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश म्हात्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवज्योत जावळेकर यांनी केले.