| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ विद्या मंदिर शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांवर विश्वास दाखवावा, अशी सूचना संस्थेचे संयुक्त सचिव विवेक पोतदार यांनी केली. दरम्यान, माध्यमिकवर्गातील विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि वार्षिक गुणदर्शन समारंभाचे आयोजन केले होते.
विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ ममदापूर येथील नेरळ विद्या मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हर्णे मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. अदिती पिंपळखरे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संयुक्त सचिव विवेक पोतदार, संस्थेचे विश्वस्त डॉ. मिलिंद पोतदार, शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख खैरे, तर कार्यकारिणी सदस्य रमेश कुंभार, सुशांत बदले तसेच सुरेश कदम यांच्यासह नेरळ विद्या मंदिर मुख्याध्यापक पी.बी. विचवे, उपमुख्याध्यापक गुजराती, पर्यवेक्षक गिरासे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे, प्राथमिक विभगाच्या मुख्याध्यापिका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पालक शिक्षक संघाचे अभंगे, भावसार, हरेश सोनावळे, तसेच राजू झुगरे, सुभाष नाईक यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सांस्कृतिक समिती प्रमुख शिल्पा लाड आणि बक्षीस समिती प्रमुख वैशाली अभ्यंग यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.
सुरुवातीला प्रास्ताविक मुख्याध्यापक पी.बी. विचवे यांनी तर क्रीडा शैक्षणिक अहवाल वाचन उपमुख्याध्यापक एम.के. गुजराती यांनी केले. सुरुवातीला दहावीमध्ये गुणवंत झालेल्या तसेच प्रत्येक विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावर्षीचा आदर्श विद्यार्थिनी ऋतुजा गणेश भाईर, तर आदर्श विद्यार्थी म्हणून प्रथमेश संभाजी सरनोबत यांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, गणेश वंदना, छत्रपती शिवाजी महाराज यांना नृत्यातून मानवंदना शिवगीत सादर करू केली. शेती वर आधारित शेतकरी गीत, अभिनेते लक्ष्मण बेर्डे यांच्या गीतांची धावती मैफल, जागर गोंधळ, कोळी गीते, दशावतार, आंबा बाजला गो, खैके पान बनारस वाला, लावणी, गरबा, गजर कीर्तनाचा, साऊथ इंडियन डान्स, जोगवा, महाराष्ट्र चित्रपट दर्शन आदी कार्यक्रमांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.







