विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा

पनवेल आयुक्तांचे आवाहन
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु असून, यास मिळणार्‍या अल्पप्रतिसादाच्या पार्श्‍वभूमीवर 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी स्वतःहून पुढाकार घेण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पालिका क्षेत्रातील चारही प्रभागातील विविध शाळांमध्ये 3 जानेवारी पासून सुरू झाले होते. या लसीकरणा अंतर्गत सुमारे 22 हजार मुलांचे लसीकरण झाले. शिक्षण विभागाच्या मदतीने 230 शाळांमध्ये वेळापत्रक ठरवून हे लसीकरण करण्यात आले. या अंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळांमध्ये लसीकरणाचे विशेष सत्रे ठेवण्यात आली होती.
मात्र ज्या विद्यार्थ्यांचे बाहेरगावी गेल्याने किंवा आजारी असल्याकारणाने किंवा अन्य कोणत्या कारणाने लसीकरण होऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांचे व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालिकेच्यावतीने आयुक्तांनी केले आहे. तसेच शाळाबाह्य 15-18 वयोगटातील मुलांनीही पालिकेच्या सूचित लसीकरण केंद्रावर जाऊन आपले लसीकरण करून घ्यावे असे मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सांगितले आहे.
पनवेल महापालिका हद्दीत सुमारे 40 हजार मुले आहेत. त्यापैकी 22 हजार मुलांचे लसीकरण झाले आहे. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी मुलांना लस देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी. रोज होणारे लसीकरणाचे सेशन ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्याचबरोबर महापालिकेच्यावतीने समाजमाध्यमावर प्रसिद्ध होणार्‍या प्रेस नोट मध्येही रोजच्या लसीकरणाची माहिती देण्यात येणार आहे.

तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवरती जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर महापालिका भर देत आहे. ग्रामीण भागातील लसीकरणही महापालिका पुन्हा सुरू करत आहे. ज्या नागरिकांचे दुसर्‍या डोसचे लसीकरण राहिले आहे अशा नागरिकांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version