मेडिकलमधील सर्व नियम विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे: डॉ. डहाके

| नेरळ | वार्ताहर |
कोतवाल वाडीमधील हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्रामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले जात आहेत. या विकास केंद्राच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या नर्सिंग कोर्समध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी मेडिकल व्यवसायातील आपल्या वरिष्ठांच्या सूचना समजून घ्याव्यात आणि जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना डॉ. श्रीकांत डहाके यांनी केली.

हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्रामध्ये कोतवाल वाडी ट्रस्ट आणि लार्सन ट्युब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गेली दहा वर्षे रुग्ण सहाय्यक वर्ग हा नर्सिंग कोर्स चालविला जातो. तसेच दोन वर्ष जनरल ड्युटी असिस्टंट हा कोर्स गव्हर्मेंट सर्टिफिकेट कोर्स म्हणून चालविला जात आहे. महिला विकास केंद्राच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या कोर्समध्ये यावर्षी तब्बल 100 मुली शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यासाठी नामवंत डॉक्टर यांना कोतवाल वाडी ट्रस्टकडून पाचारण करण्यात आले होते. यावेळी कर्जत आणि बदलापूर परिसरातील अनेक डॉक्टर उपस्थित होते.

वैद्यकीय क्षेत्रातील या कार्यक्रमाला शहीद भवन मध्ये पुणे येथील प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. असमोल महाजनी यांनी मेंदूचे आजार, लकवा, पक्षाघात यांच्याबाबत त्यांची लक्षणे तसेच अशा रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करावेत याबद्दल मार्गदर्शन केले. तर, महिलांच्या समस्यांबाबत पुणे येथील डॉ. अदिती आंबेकर यांनी महिलांची मासिक पाळी, वेळेचे आरोग्य, गर्भधारणा तसेच बाळंतपण यामधील आययूआय तसेच आयव्हीएफ यांच्या विविध प्रश्‍नांवर मार्गदर्शन केले.

Exit mobile version