स्वच्छ पनवेलचा विद्यार्थ्यांचा नारा

| पनवेल । वार्ताहर ।

समाजाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हरा गिला सुखा निला हा संदेश नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी पनवेलमध्ये स्वच्छथॉन रॅली काढण्यात आली होती. या उपक्रमाच्या माध्यमातून सिंगल यूज प्लास्टिकवरील निर्बंधाविषयी जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून या माध्यमातून प्रोग्रेसिव्ह पनवेल हा ब्रॅण्ड जनमानसात पोहचवण्याठी प्रयत्न केले जाणार आहेत.

आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 पनवेल शहरात राबवले जात आहे. याचाच भाग म्हणून पनवेल शहरातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी पनवेल महापालिका आणि आयटीएम इस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छथॉन रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, डॉ. संकल्प राव, डॉ. किरण राणे, अनिल कोकरे, शैलेश गायकवाड, इन्फिनिटी फाऊंडेशनचे सर्व निरीक्षक उपस्थित होते. यावेळी उपायुक्त सचिन पवार यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या कचरा पासबुक संकलन योजनेबद्दल माहिती दिली.

शंभरहून अधिक विद्यार्थी सहभागी
नवीन पनवेल येथील आयटीएम महाविद्यालयातून या रॅलीला सुरुवात झाली होती. त्यानंतर पुढे अय्यपा मंदिर, रामकृष्ण मिशन कॉर्नर, सीकेटी कॉलेज, बिकानेर स्टेशन, एचडीएफसी सर्कल, डी-मार्ट, फोनिक्स हॉटेल, आदई सर्कलवरून शेवटी पुन्हा आयटीएम महाविद्यालयापर्यंत ही रॅली मार्गस्थ झाली. यावेळी आयटीएम महाविद्यालयाचे शंभरहून अधिक विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये स्वच्छता संदेश लिहिलेले बॅनर देण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयात खास सेल्फी पाँईट तयार करण्यात आला होता. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले.

पनवेल महापालिका प्रोग्रेसिव्ह पनवेल बनण्यावर भर देत आहे. यासाठी तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका
Exit mobile version