| खरोशी | प्रतिनिधी |
मे महिन्याची उन्हाळी सुट्टी संपून आता सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. लहान बालकांची किलबिल ऐकायला मिळणार आहे. 16 जूनपासून सर्व प्राथमिक माध्यमिक शाळा सुरू होणार असून, पेण पंचायत समिती अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या 215 प्राथमिक शाळा नगरपालिका 9 शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित 38 शाळा, शासकीय आश्रमशाळा 5 अशा पहिली ते आठवीच्या एकूण 267 शाळांमधील 15 हजार 266 विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत, अशी माहिती पेण पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी शर्मिला शेंडे यांनी दिली.
इयत्ता पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तके प्राप्त झाली आहेत. पाठ्यपुस्तके वितरणाची कामे विषय साधन व्यक्ती यांच्या मार्फत केले जाते. कमी जास्त पट संख्येनुसार केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरावर पुस्तकांचे समायोजन केले जाते. इयत्ता पहिलीसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण 11 ते 13 जूनदरम्यान सार्वजनिक विद्यामंदिर पेण येथे संपन्न झाले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत पुस्तक दिंडी काढून त्याचबरोबर ढोल ताशाच्या गजरामध्ये सर्व पहिलीसाठी येणाऱ्या नवीन बालकांचा स्वागत पूजन फुलांची उधळण करून त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. याच वेळी तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद अंतर्गत विविध अधिकारी वर्गांच्या भेटीगाठी होणार आहेत.
येणाऱ्या नवीन सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक शिक्षक संघ, शिक्षक पालक संघ आदी विविध समित्यांचे सर्व पदाधिकारी स्वागतासाठी यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.







