विद्यार्थ्यांना निकालपत्रासह मिळणार उत्तरपत्रिका

शिक्षण विभागाचा अभिनव प्रयोग

| रायगड | प्रतिनिधी |

राज्य मंडळाशी संलग्न शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा निकाल महाराष्ट्र दिनी (1 मे) जाहीर केला जाणार आहे. मात्र, यंदा या निकाल जाहीर प्रक्रियेत अभिनव बदल करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक चित्र पालकांसमोर येण्यासाठी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाही पालकांना दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत संयुक्त परिपत्रकाद्वारे विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना सूचना दिल्या आहेत. राज्य मंडळाच्या सर्व शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यापूर्वी 1 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षक व पालकांचे संयुक्त कर्तव्य आहे. त्यादृष्टीने एक पाऊल टाकण्यात आले आहे. निकाल देतांना आता केवळ प्रगतीपुस्तक न देता विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांना दाखविणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिक्षण आयुक्तानी असे आदेश दिले आहेत. पालकांच्या निदर्शनास आणल्यामुळे पालकांना आपल्या पाल्याची संकल्पनात्मक समज, उत्तर लिहिण्याचे कौशल्य आणि नेमक्या चुका कोठे होत आहेत, याचे अचूक निदान करता येईल. केवळ गुणांवर लक्ष केंद्रित न करता, मुलांच्या कौशल्यांवर आधारित प्रगती मोजणे यामुळे शक्य होणार आहे.

उत्तरपत्रिका पालकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्यामुळे उत्तरपत्रिकेमध्ये नमूद केलेल्या प्रतिसादाच्या आधारे विद्यार्थ्यांची संकल्पनात्मक समज, क्षमता, कौशल्यांचे अचूक निदान करता येईल, विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनाची गरज ओळखून पालकांच्या मदतीने उपाययोजना करणे सुलभ होईल, वैयक्तिक पातळीवर उपचारात्मक अध्ययन आणि गुणवत्ता संवर्धनासाठी उपक्रम प्रभावीपणे राबवता येतील, पालक-शिक्षक यांच्यात सतत संवाद होईल, असे नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version