हाशिवरे महात्मा गांधी विद्यालयाचे स्नेहसंमलेन उत्साहात
| खारेपाट | वार्ताहर |
स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासने सखोल अभ्यास करावा, असे मार्गदर्शन मंत्रालयातील विधी उच्च तंत्रशिक्षण विभागाचे अवर सचिव संकेत पाटील यांनी केले. अलिबाग तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हाशिवरे, वैजाळी इंग्रजी माध्यम शाळा व वैजाळी मराठी माध्यम प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र मोकल यांचय अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉ. मनमोहनसिंह यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आयएसएस, आयपीएस आदी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सखोल अभ्यास करावा तसेच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, अभ्यासात सातत्य प्रयत्न करणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर आपल्या गावच्या विकासासाठी सहकार्य करावे. महत्त्वाचे म्हणजे सदर विद्यालयाच्या शैक्षणिक आलेख उल्लेखनीय असून, इयत्ता दहावी-बारावी तसेच शैक्षणिक, कला, क्रीडा, विज्ञान अशा विविध क्षेत्रात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे, त्याबद्दल संकेत पाटील यांनी सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे कार्य आहे. विशेष म्हणजे, माझ्या वडिलांनी याच विद्यालयात शिक्षण घेतले आहे म्हणूनच मी आज तुमच्यासमोर उभा आहे, असे मत संकेत पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान, संकेत पाटील यांच्यासह साहित्यिक कैलास पिंगळे, दिलीप मोकल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी रांगोळी प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन यांची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तसेच विद्यार्थ्यांप्रमाणे या विद्यालयातील शिक्षकांनीही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार श्री. शिकारे, शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार लतिका पाटील यांना देण्यात आला.
यावेळी हाशिवरे हितवर्धक मंडळ संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र मोकल, उपाध्यक्ष सरोज डाकी, सचिव ज्ञानेश्वर मोकल, अॅड. शैलेश मोकल, निशिकांत मोकल, सुबोध मोकल व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाचे प्राचार्य बी.डी. गायकवाड, माजी मुख्याध्यापक श्री. कडवे, माजी पर्यवेक्षक ए.डी. पाटील तसेच ऋतुजा पाटील, प्रतिभा पाटील आणि प्रज्ञा धसाडे व संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पूरो आणि वर्षा नाईक यांनी केले.
दरम्यान, विद्यालयाच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी हाशिवरे ग्रामपंचायत माजी सरपंच संध्या पाटील, तसेच पंचक्रोशितील सरपंच व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम चांगल्या प्रकारे सादर केल्याबद्दल रसिक प्रेक्षकांनी विद्यालयातील कलावंतांचे कौतुक केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.डी. गायकवाड, सर्व शिक्षक, पालक संस्थेचे पदाधिकारी व सर्व मान्यवरांचे सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमाला राजिप गटशिक्षणाधिकारी पिंगळा, रेवस केंद्रप्रमुख विनोद पाटील उपस्थित होते.