| मुंबई | प्रतिनिधी |
एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे पोट हिस्से आता अवघ्या दोनशे रुपयांमध्ये होणार आहेत. राज्य भूमी अभिलेख विभागाने ममोजणी फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेत, त्याबाबतचे आदेश काढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचून दिलासा मिळणार आहे. तर भूमी अभिलेख विभागाचे नकाशे व सातबारे अद्ययावत होणार आहेत.
लवकरच याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. एकत्र कुटुंबातील सदस्यांच्या नावे जमिनीचे पोट हिस्से करण्यासाठी सध्या दोन हेक्टरांपर्यंत क्षेत्रासाठी 3000 रुपये मोजणी फी आकारली जात आहे. त्यापुढील स्लॅबसाठी म्हणजे दोन हेक्टरनंतरच्या क्षेत्राच्या पुढील हिश्शाच्या मोजणीसाठी 1000 रुपये फी घेतली जात आहे. परंतु, नुकताच जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख राज्य संचालक यांच्याकडून मोजणी फीमध्ये सवलत देण्याचे आदेश काढला आहे. याच्या अंमलबजावणीचे निर्देश जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयांना दिले आहेत. त्यानुसार आता जमिनींच्या पोटहिश्श्यांच्या मोजणीसाठी फक्त दोनशे रुपये फी घेतली जाणार आहे.
यासाठी एकत्र कुटुंबातील सदस्यांच्या शेतजमिनीचा मुद्रांक शुल्क विभागाचा नोंदणीकृत वाटप दस्त किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 नुसार तहसीलदारांचा आदेश सादर करावा लागणार आहे. त्याचबरोबर सातबारा व नकाशे अद्ययावत होण्यास मदत होणार आहे. नकाशामध्ये मोजणीद्वारे वेळीच हद्दी, क्षेत्र, चतुःसीमा यांच्या मोजमापाच्या नोंदी घेतल्याने भविष्यातील क्षेत्र व हद्दीबाबतचे वाद कमी होण्यास मदत होईल.
जमिनींच्या पोट हिस्सा मोजणी फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोजणी फी साठीचे पैसे वाचणार आहेत. त्याचबरोबर या सवलतीमुळे प्रकरणांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे अभिलेख विभागाकडील सातबारा व नकाशे अद्ययावत होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जमीन पोट हिस्सा मोजणीची प्रकरणे अर्ज प्राप्त झाल्यापासून एक महिन्याच्या आत उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांना निकाली काढावा लागणार आहेत. त्याबाबतचे आदेश जमाबंदी आयुक्त व राज्य संचालक, भूमी अभिलेख विभाग यांच्याकडून देण्यात आले आहेत.संमतीने पोट हिस्सा मोजणीमध्येही सवलतसंमतीने पोट हिस्सा मोजणी व दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात येणाऱ्या वाटप मोजणी फी मध्येही सवलत देण्यात आली आहे. त्यांनाही मोजणीसाठी फक्त दोनशे रुपयेच द्यावे लागणार आहेत.
दोनशे रुपयांत जमिनींचे पोटहिस्से
