। पेण । वार्ताहर ।
पेण येथील भुमिअभिलेख कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचा कुरण. वेळोवेळी तक्रारी होऊन देखील वरिष्ठ या तक्रारीकडे कानाडोळा करत आहेत. या कार्यालयात मोजणीचे जवळपास 1200 ते 1500 प्रकरण प्रलंबित आहेत. परंतु सर्व सामान्यांच्या मोजणी प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि धनदांडग्यांचे काम लगेच होत आहे असाच काहिसा प्रकार ज्येष्ठ नेते तथा समाजसेवक नरेन जाधव यांना आला आहे.
नरेन जाधव यांनी शुक्रवारी भूमी अभिलेख कार्यालया समोर प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की, भूमी अभिलेख कार्यालयातून नोटीस जावक क्रं. 617 दि.23 एप्रिल नुसार आम्हाला दिलेल्या वेळेत आम्ही शेतकरी व चतुर सीमेवरील शेतकरी सकाळी 9 वा. पासुन आंबेघर येथील सर्वे क्र. 120/2 येथे जमलो होतो. महत्वाची बाब म्हणजे या कार्यालयाने आमच्याकडून 12 हजार रुपये अतिरिक्त शुल्क भरून घेतले होते. असे असताना घटनास्थळी मोजणी करायला अधिकारी आलेच नाही. तसेच आम्हा शेतकर्यांना मोजणी रद्द केल्याचे खुप उशिरानंतर सांगण्यात आले. त्यामुळे वेळ खर्च व मानसिक त्रास झाला. या अधिकार्याच्या मनमानीमुळे मी त्यांच्या विरूद्ध कोर्टात नुकसान भरपाईचा दावा टाकणार आहे. या कार्यालयात प्रत्येक बाबीसाठी पैशाची मागणी केली जाते. 300 रूपया पासुन 6 हजार पर्यत पैसे घेतले जात आहेत. महत्वाची बाब म्हणजे या अधिकार्यांना विचारायला गेल्यास आरेरावी करून कायद्याची भिती दाखवून सर्व सामान्यांनविरुध्द गुन्हा दाखल करण्याची दमदाटी करतात. तरी या कार्यालयाच्या अधिकार्यांकडे वरिष्ठांनी त्वरीत लक्ष घालावे अन्यथा मोठे आंदोलन छेडावे लागेल असे त्यांनी सांगितले.
याबाबत भूमी अभिलेख अधिक्षक जाधव यांना विचारणा करण्यासाठी प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी गेले असता त्यांच्या केबिनला बाहेरुन कडी लावलेली होती.