पोलीस उपनिरीक्षकांना बनविले वरिष्ठांचे सारथी

। चिरनेर । दत्तात्रेय म्हात्रे |

नवी मुंबई पोलीस दलात प्रगती योजनेनुसार पोलीस उपनिरीक्षकांची पदोन्नती मिळालेले 18 कर्मचारी दोन वर्षांपासून वरिष्ठांच्या वाहनांवर चालक म्हणून काम करीत आहेत. शासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे पोलीस दलातुन संताप व्यक्त केला जात आहे.

पोलीस दलात किमान 10,20,30 वर्षं सेवा केलेल्या पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम केलेल्या अनेक कर्मचार्‍यांना फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या अध्यादेशानंतर पोलीस उपनिरीक्षकपदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षकांची पदोन्नती मिळालेले अनेक कर्मचार्‍यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामकाजाला सुरुवात केली आहे. मात्र पोलीस उपनिरीक्षकांच्या रिक्त जागांची संख्या कमी आहे. त्यामुळे पदोन्नती मिळाल्यानंतरही फक्त जागा रिक्त नसल्याने याआधी काम करणार्‍या पदावरच कार्यरत आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातही पोलीस उपनिरीक्षकांची पदोन्नती मिळलेले असे 18 कर्मचारी दोन वर्षांपासून वरिष्ठांच्या वाहनांवर चालक म्हणून काम करीत आहेत. शासनाकडून त्यांना पोलीस उपनिरीक्षक श्रेणीप्रमाणेच वेतन अदा करते. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पदोन्नतीनंतरही काम मात्र वाहनचालकांचेच करीत असल्याने प्रत्यक्षात पोलीस उपनिरीक्षकांच्या कामाचा अनुभव घेता येत नसल्याची आणि गणवेशात असलेल्या तफावतीतील खंत त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

काहींनी सेवानिवृत्तीही एस-14 वेतनश्रेणीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकांच्या जागाच रिक्त नसल्याने पदोन्नती मिळाल्यानंतरही याआधी ज्या पदावर काम करीत होते. त्याच पदावर काम ते करीत आहेत. जशा जागा रिक्त होतील त्यानंतरच त्यांच्या नियुक्त्या केल्या जातील. याला अन्य पर्याय उपलब्ध नसल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. शासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे पोलीस दलातुन संताप व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version