ई रिक्षा,पेव्हर ब्लॉकचा अहवाल सादर करा

पालकमंत्र्यांचे निर्देश,आढावा बैठकीत चर्चा


| माथेरान | वार्ताहर |

ई रिक्षा व क्ले पेव्हर ब्लॉक्सचा अहवाल तातडीने सर्वोच्च न्यायालयात सादर करावा,असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आ. महेंद्र थोरवे यांनी माथेरानला आढावा बैठक घेतली होती. बैठकी दरम्यान नागरिकांनी विविध समस्यांचा पाढाच वाचला होता. या पार्श्वभूमीवर थोरवे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठक आयोजित केली होती.यावेळी जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, माजी विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, माजी नगरसेवक संदीप शिंदे, युवा सेना अध्यक्ष गौरंग वाघेला आदीसह माथेरानकर उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी सांगितले की ई रिक्षाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यासाठी दिला आहे. मात्र ई रिक्षा सोबत क्ले पेव्हर ब्लॉक्सचा देखील एकत्रित अहवालही सादर करण्याचे सरकारी वकिलांनी सांगितले होते मात्र स्थानिक व पर्यटकांची गरज पाहता तात्काळ ई रिक्षाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाईल,असे सुचित केले.

तीन महिन्यांच्या पायलट प्रोजेक्ट दरम्यान महिंद्रा कंपनीच्या ई रिक्षा उत्तमरीत्या चालल्या त्यामुळे ई रिक्षा हात रिक्षा चालकांना चालविण्यास देण्याची मागणी रिक्षा संघटनतर्फे करण्यात आली. एम पी 93 हा भूखंड पालिकेला मिळणे आवश्यक असल्याचे मनोज खेडकर यांनी सांगितले. सुट्टीच्या कालावधीत मोठया प्रमाणात पर्यटक येतात त्यामुळे सध्याची पार्किग व्यवस्था अपुरी पडते. त्यामुळे हा एम पी 93 हा भूखंड महसूल विभागाने नागरपालिकेस वर्ग केल्यास पार्किंगची समस्या मिटू शकेल 500 गाड्यांची पार्किंग याठिकाणी होऊ शकते. सदर भूखंडाची हस्तांतरण फी रु 7 कोटी पर्यंत जाऊ शकते त्यामुळे हा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घ्यावा लागेल असे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

आमदार महेंद्र थोरवे यांनी फोनद्वारे या बैठकीत माथेरान संदर्भात विषय मांडले. इंदिरा नगर वस्तीला कमी दाबाने वीज पुरवठा होतो त्यासाठी एक ट्रान्सफॉर्मर तात्काळ माथेरानला घेऊन जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे इंदिरा नगरची विद्युत पुरवठ्याची समस्या मार्गी लागेल
कर्जत- माथेरान बस सेवा नादुरुस्त बसमुळे सातत्याने बस फेऱ्या रद्द कराव्या लागतात. यासाठी दोन नवीन बसची मागणी खेडकर यांनी केली. सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना डीपीडीसीमधून एक नवीन बस खरेदी करण्याचे सांगितले.

Exit mobile version