। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेत थळ येथील आरसीएफ कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाची पुढे ढकलण्यात आलेल्या जनसुनावणी संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना गोंधळलेल्या पालकमंत्र्यांना सारवासारव करण्याची वेळ ओढवली. यावेळी पालकमंत्र्यांना थांबवत जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी माईक बंद करुन बंडखोर आमदार महेंद्र दळवीसह दोघांनी उदय सामंत यांच्या कानात सांगितल्यानंतरच यावर उत्तर दिल्याने हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
पालकमंत्री उदय सामंत यांनी हिवाळी अधिवेशन पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत अधिवेशन पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडे 83 प्रश्न आले असून, या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यानंतर सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे आदी अधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत आरसीएफ विस्तारित प्रकल्पाची 15 नोव्हेंबर रोजी आयोजित जनसुनावणी ठिकाणी जिल्हा प्रशासनातील अधिकारी न गेल्याने पुढे ढकलण्यात आली? आपण पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात असे घडत आहे? असे विचारले. या प्रश्नाला उदय सामंत यांनी उत्तर देण्यास सुरुवात करताच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सामंत यांना थांबवले. यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी उत्तर देताना जिल्हाधिकारी यांनी बंद केलेल्या माईकचा उल्लेख करीत, त्यांनी माईक बंद केला असला तरी यावेळी काय चर्चा झाली हे मी सांगतो असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. आरसीएफ विस्तारित प्रकल्पाची जनसुनावणी कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याच्या स्थितीमुळे रद्द करण्यात आली.
कंपनी प्रकल्पग्रस्त यांच्या नोकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच पुन्हा जनसुनावणी आयोजित करण्यात येणार आहे, असे स्पष्ट करीत घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकल्प कुठेही जाणार नसून थळमध्येच होईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. रखडलेल्या मेडिकल कॉलेजच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मेडीकल कॉलेजला निधी देण्यात येणार असून त्यांनतर काम सुरु होईल असे थातूरमातूर उत्तर दिले. तर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवर देखील पालकमंत्र्यांना ठोस उत्तर देता आले नाही. आंबेत पुलाच्या कामाबाबत बोलताना आमच्याच माध्यमातून सदर काम होत असून त्याचे श्रेय कोणी घेत असेल तर इलाज नाही असे म्हणत तटकरेंना टोला दिला. डीपीडीसीचा निधी मार्च अखेरपर्यंत संपविण्याबाबत निर्देश दिल्याची माहिती देखील यावेळी उदय सामंत यांनी दिली.