| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ विद्या मंदिर ही शाळा माझी असून, ही अनुदानित शाळा सौर ऊर्जेवर वीजपुरवठा करणारी शाळा असेल असे जाहीर केले. तर, कोकण विभाग मतदारसंघातील सर्व अनुदानित शाळा या डिजिटल करण्यासाठी आपला आमदार निधी खर्च केला आहे. आगामी चार वर्षांच्या काळात पाच जिल्ह्यांतील सर्व अनुदानित शाळा या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या शाळा असतील, असा विश्वास आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला. दरम्यान, नेरळ विद्या मंदिर शाळला दोन एकर एवढी करोडो रुपयांची जमीन दान करणाऱ्या शांताबाई नाडकर्णी आजी या ग्रेट पर्सनॅलिटी आहेत, असे गौरवोद्गार शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केले.
नेरळ विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ ममदापूर येथील प्रांगणात शांताबाई नाडकर्णी आजी यांच्या स्मारकाचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्मारकाचे उद्घाटन कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी विद्या मंदिर मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष अरुण धारप, संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकला मुळ्ये, कोषाध्यक्ष सुरेश देशमुख, माजी अध्यक्ष डॉ. भारतकुमार लाड, डॉ. मिलिंद पोतदार, संस्थेचे संयुक्त सचिव विवेक पोतदार यांच्यासह विद्या मंदिर मंडळाचे विविध महाविद्यालय शाळा यांचे प्राचार्य मुख्याध्यापक व्यासपीठावर उपस्थित होते.
नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापक पी.बी. विचवे, टिपणीस महाविद्यालय प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे, दादर विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक एम.के. परदेशी आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्या मंदिर मंडळाचे विश्वस्त डॉ. मिलिंद पोतदार यांनी प्रास्ताविक करताना आताच्या पिढीला शांताबाई नाडकर्णी यांची ओळख नाही. मात्र, त्या मुंबईत शिक्षण विभागात नोकरी करीत असल्याने त्या शिक्षणप्रेमी म्हणून परिचित होत्या. त्यांनी शाळेसाठी दोन एकर दान केली, अशी माहिती दिली.
शांताबाई नाडकर्णी यांचे योगदान
नेरळ विद्या मंदिर या शाळेची स्थापना झाली आणि शाळेची स्वतःची इमारत नसल्याने नेरळ गावातील वामनराव काळे यांच्या वाड्यात 1951 मध्ये भरली जात होती. तर, सध्या शाळेची वास्तू असलेल्या या जमिनीमध्ये निवासस्थान असलेल्या शांताबाई नाडकर्णी यांनी आपल्या ताब्यातील दोन एकर जमीन नेरळ विद्या मंदिर शाळेसाठी दान देण्याचा निर्णय झाला. त्यानेतर 1957 मध्ये नेरळ ममदापूर ग्रामपंचायत मधील या जमिनीमध्ये नेरळ विद्या मंदिर ममदापूर ही शाळा सुरू झाली.