| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील जमिनीमध्ये असलेली लाल मातीचा खजिना गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबईत पोहोचवला जात होता. मात्र, एप्रिल महिन्यात महसूल खात्याच्या धडक कारवाईने लाल मातीची तस्करी थांबली होती. परंतु, आता पाऊस सुरू होत असताना गुडवण भागातील जमिनीमधून लाल माती काढून पळविली जात आहे. दरम्यान, साधारण पाच एकर जमिनीतून आतापर्यंत लाल मातीची तस्करी करण्यात आली असून, महसूल विभागाला एक रुपयाची रॉयल्टी लाल मातीची विक्री करण्यासाठी काढण्यात आली नाही.तर तेथून लाल माती काढण्यासाठी वन जमिनिंमधून रस्ते बनविण्यात आले असताना वन विभाग सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्यातील प्रामुख्याने आदिवासी भागातील जमिनीमध्ये गार्डन, बगीचे आणि मैदान यांच्यासाठी आवश्यक असलेली लाल माती आहे. त्या लाल मातीची विनापरवाना तस्करी मागील दोन वर्षांपासून सुरू होती. तालुक्यातील पाथरज, ओलमन, खांडस आणि नांदगाव या ग्रामपंचायतीमधून सुरू असलेली लाल मातीची तस्करी सात आणि आठ एप्रिल रोजी कर्जत तहसीलदार आणि महसूल विभाग यांनी कारवाई केली. त्यानंतर कर्जत तालुक्यातून पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईमध्ये रात्रीच्या अंधारात जाणारे हायवा ट्रक हे बंद झाले होते. साधारण सव्वा महिना कर्जत तालुक्यातून जाणारी लाल माती ही महसूल खात्याच्या जागत्या पहाऱ्यामुळे ही वाहतूक बंद होती. मात्र, लाल मातीची तस्करी करून गोरखधंदा करणाऱ्या ट्रकवाले हे शांत राहणार नाहीत, हे जवळपास नक्की होते. परंतु, शासनाला कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क न भरता गेली दोन वर्षे लाल माती काढून त्या मातीची तस्करी सुरू आहे. गुडवण येथील जंगल भागात असलेली लाल माती मिळविण्यासाठी तब्बल पाच एकर जमीन पोखरून ठेवला आहे. चक्क वन जमिनीमधून रस्ता बनविला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काढण्यात आलेल्या लाल मातीच्या उत्खननाचे पंचनामे महसूल विभाग करणार आहे की विनापरवाना उत्खनन करणाऱ्याना अभय दाखवले जाणार आहे.