महामार्गावर दरडीचा धोका कायम
| पोलादपूर | शैलेश पालकर |
जुन्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 वरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गावर नवीन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 सुरू असताना अवकाळी पावसाला सुरूवात होण्यापूर्वी पोलादपूर तालुक्यातील जुन्या कशेडी घाटातील रस्त्याला भेगा पडून त्यातून नवीन महामार्गावर दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असताना मंगळवारी सायंकाळी खेड हद्दीमध्ये भुयारी मार्गावर चार-सहा मोठमोठे दगड पडून भूस्खलनाचा धोका स्पष्ट झाला आहे.
पोलादपूर तालुक्यातील कोंढवी फाटयाच्या पुढे काही अंतरावर जुन्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 वरून कातळी बंगल्याकडे जाताना जुन्या रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्त्याचा मोठा भाग भेगा पडल्याने भूस्खलन होऊन नवीन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर कोसळण्याची चिन्हे दिसून येत आहेत. या संभाव्य धोक्याच्या ठिकाणी तशा सूचना देणाऱ्या पताका लावण्यात येऊन या भेगाग्रस्त रस्त्यावरून वाहने नेण्यापासून परावृत्त केले जात आहे. यंदाच्या पावसात याठिकाणी भूस्खलन होण्याचा धोका कायम असताना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास कातळी भोगावच्या हद्दीतील भुयारी मार्ग संपल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका हद्दीमध्ये भुयारी मार्गावर चार-सहा मोठमोठे दगड पडल्याची माहिती मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी कळविली.
यामुळे नवीन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अचानकपणे भूस्खलनाचा नवीन धोका निर्माण झाला असला तरी जुन्या मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 वरील रस्ता खचून तो नवीन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर कोसळण्याचा धोकादेखील कायम असल्याने भेगा पडलेल्या रस्त्याच्याबाजूने नवीन रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार नसल्यास नवीन महामार्ग बंद होऊ नये यासाठी भेगा पडलेल्या जुन्या महामार्गावरील जुना रस्ता सुरक्षितपणे फोडण्याचे काम तातडीने घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट असताना कोणतीही कृती केली जात नसल्याने धोका कायमच राहणार आहे.