मुलांशी मनमोकळा संवाद महत्त्वाचा; पालकांनी स्वत:ला शिक्षित करणे गरजेचे
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
किशोरवयीन मुलांमध्ये धूम्रपान आणि ई-सिगारेटच्या व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मुलं या सवयी एक ट्रेंड म्हणून स्वीकारतात जे त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. पालकांनी स्वत:ला याबाबत शिक्षित करणे आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने आरोग्यास होणाऱ्या दुष्परिणामांविषयी मुलांशी मनमोकळा संवाद साधणे गरजेचे असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
धूम्रपान आणि ई सिगारेटचे व्यसन हे केवळ प्रौढांमध्येच नाही तर किशोरवयीन मुलांमध्येही सामान्यपणे आढळून येत आहे. किशोरवयीन मुलांमध्ये धूम्रपान आणि ई-सिगारेटच्या सवयीच वाढ होण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. 13 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलांना धूम्रपान आणि व्हेपिंगशी संबंधित धोक्यांबाबत शिक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे. किशोरावस्थेत निकोटीनच्या सेवनाने मेंदूच्या विकासात अडथळ येऊ शकतो, ज्यामुळे लक्ष केंद्रित करणे, शिक्षण घेणे आणि वैयक्तिक विकासात परिणाम होतो.
धूम्रपान किशोरवयीन मुलांमध्ये फुफ्फुसांच्या विकासास हानीकारक ठरते, ज्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते आणि दमा, ब्राँकायटिस आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजचा धोका वाढतो. यामुळे वीएएलआय-व्हेप असोसिएटेड लंग इंज्युरी नावाचा एक नवीन आजार आढळून येऊ लागला आहे. ज्याचा आतापर्यंत कोणताही इलाज नाही आणि तो अनेक प्रकरणांमध्ये घातक ठरला आहे. पालकांनी तंबाखू, निकोटीन आणि हल्ली किशोरवयीन मुले वापरत असलेल्या व्यसनांच्या पर्यायाबाबत स्वतःला शिक्षित केले पाहिजे. धूम्रपान त्यांना तात्पुरते समाधान देऊ शकते, परंतु श्वसन आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. धूम्रपान आणि व्हेपिंग हे दोन्ही फुफ्फुसांना हानिकारक रसायनांच्या संपर्कात आणतात जे नाजूक ऊती आणि श्वसनमार्गांना नुकसान पोहोचवतात. कालांतराने दीर्घकालीन दाह निर्माण होतो, फुफ्फुसांची क्षमता कमी होते आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
किशोरवयीन मुलांशी उघडपणे संवाद साधल्यास त्यांना धूम्रपान आणि व्हेपिंगचे परिणाम समजण्यास मदत होऊ शकते. पालकांनी आपल्या मुलांना धूम्रपानाची सवय सोडण्यास आणि फुफ्फुसांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया डॉ. सुप्रिया बांबरकर यांनी व्यक्त केली.
पालकांनी मुलांना व्यसन सोडण्याकरिता असलेल्या सपोर्ट ग्रुप किंवा समुपदेशकांची मदत घ्यावी. किशोरवयीन मुलांना हे समजून घेणे आवश्यक आहे की धूम्रपान आणि व्हेपिंगमुळे गंभीर व्यसन आणि आरोग्यासंबंधी दीर्घकालीन समस्या उद्भवतात. या वाईट सवयी वेळीच सोडणे मुलांच्या भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते, असे डॉ. शाहिद पटेल यांनी सांगितले.
तंबाखू आणि ई-सिगारेटमधील निकोटीन हे हार्मोन उत्पादनावर परिणाम करू शकते, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी करते तर, महिलांमध्ये मासिक पाळी आणि ओव्हुलेशनमध्ये व्यत्यय आणते. कालांतराने, हे त्यांच्या प्रजनन क्षमतेला हानी पोहोचवू शकते. किशोरावस्था ही शारीरीक वाढ आणि हार्मोनल संतुलनासाठीचा महत्त्वाचा टप्पा असून विषारी पदार्थांचा सेवनाने एखाद्याच्या प्रजनन क्षमतेला हानी पोहोचू शकते. किशोरावस्थेतील हे व्यसन भविष्यात प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकते, ज्यामुळे वेळीच प्रतिबंध करणे गरजेचे आहे, असे डॉ. रीटा मोदी म्हणाल्या.