कंपन्यामधील सांडपाण्याचा पिण्याच्या पाण्यावर परिणाम
| खोपोली | प्रतिनिधी |
पर्यावरणप्रेमी मनिष खवळे यांच्या तक्रारीची आठ वर्षानी दखल घेत बुधवारी (दि.28) प्रदुषण मंडळासह विविध विभागाच्या टिमने कंपन्यांची स्थळ पाहणी करीत पाण्याचे नमुने घेतले आहेत. त्यामुळे कंपन्यांना चांगलाच दणका बसला असून निर्णायक निकाल देत कारवाई करा अशी मागणी मनिष खवळे यांनी केली आहे.
साजगांव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक केमिकल्स कंपन्यामधील प्रदूषित सांडपाणी मोकळ्या जागेत सोडले जाते तसेच जमिनीत मुरते त्यामुळे बोअरवेलचे पाणीही प्रदूषित झाले आहे. कंपनी परिसरात वृक्षलागवड नाही. अनाधिकृत बांधकाम केले आहे. याविरोधात पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक ग्रामस्थ मनिष खवळे तब्बल बारा वर्षापासून कारवाईसाठी पत्रव्यवहार करीत आहेत. परंतु, संबंधित विभागाकडून त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत कंपन्यांना अभय दिले जात असल्याने लोकशाही दिन सुनावणीत मनिष खवळे यांनी तक्रार मांडत स्थळ पहाणी करीत पाण्याचे नमुने तपासा अशी तक्रार केल्यानंतर तहसिलदार अभय चव्हाण यांनी प्रदुषण मंडळ, आरोग्य विभाग आणि महसुल विभागाची टिम पाठवली होती.
यावेळी पुरवठा निरीक्षक अधिकारी मनोज पवार, मंडळ अधिकारी भरत सावंत, महसूल सहायक रत्नाकर बेहेरे, तलाठी वैशाली बावा, प्रदुषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी योगेश गोरे, क्षेत्र अधिकारी उत्तम माने, महसूल सेवक संजू पाटोले, आरोग्य विभागाचे हनुमंत गोवारी, संतोष पाडूळे, स्वप्नील गरुठे, विनायक मुळे, राजन कडू, सरपंच विनोद खवळे, ग्रामपंचायत कर्मचारी विजय कदम, माजी ग्रामपंचायत सदस्या ललिता पाटील, ग्रामस्थ मनिष खवले, गजानन पाटील, अशोक पाटील, कुणाल पाटील उपस्थित होते.
तक्रारदार मनिष खवळे यांच्या निवास्थानच्या बोअरवेलचे तसेच दिलीप पाटील, दिलीप सुखदरे यांच्या बोअरवेलच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर मे.सिस्टाँमँटीक कंपनी, अल्फा इंजिनियरिंग, शार्प इंडस्ट्रीज, फिनोझाँल कंपनी अशा विविध कंपन्यांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यावेळी अनाधिकृत बांधकाम तसेच वृक्षलागवड याबाबतची समक्ष माहिती अधिकाऱ्यांना खवळे
यांनी दिली.
प्रशासनाला आठ वर्षांनी आली जाग
गेल्या आठ वर्षापासून लढत असताना आताकुठे लोकशाही दिनाला जाग आली असून कंपन्यांची तपासणी करीत पाण्याचे नमुने घेतले आहेत. प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन जात असताना आरोग्य विभागाला नुमने देणार असून त्यांनीही तपासणी करण्याचे सांगत जबाबदारी झटकली असल्याने खवळे यांनी नाराजी व्यक्त केली.