। गुहागर । प्रतिनिधी ।
नाम फाऊंडेशन व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून मार्गताम्हाने येथील पद्मावती नदीतील गाळ उपसा उपक्रम राबविण्यात आला. या नदीची नाम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी बुधवारी पाहणी केली. नदीची पाहणी केल्यानंतर मार्गताम्हाने व मार्गताम्हाने खुर्द ग्रामस्थांतर्फे मकरंद अनासपुरे यांचा ग्रामदेवता पद्मावती देवी मंदिरात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. नातू यांनी पूर्वीची नदीची स्थिती खूपच भयावह होती. मात्र, आता गाळउपशाने पात्र मोठे झाले असून पाणी पातळी वाढून भविष्याचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे स्पष्ट केले व नाम फाऊंडेशनचे आभार मानले. मधुकर चव्हाण यांनी कोणतीही संस्था फुकट काहीही देत नाही. त्यासाठी लोकसहभागही महत्वाचा असतो असे स्पष्ट करुन हा उपक्रम राबविल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.
सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नदीचा गाळ काढून झालेला असला तरी तिची देखभालही केली पाहिजे असे स्पष्ट केले. प्लास्टीक, कचरा नदीत टाकू नका, त्याचे संकलन करुन त्याची विल्हेवाट किंवा प्रक्रिया कशी होईल यासाठी गावातूनच लोकसहभाग निर्माण झाला पाहिजे. भंगार जमवून व त्याची प्रक्रिया करुन अनेकजण श्रीमंत झाले आहेत. आपणही गावात अशाप्रकारचे प्रक्रिया उद्योग उभारावेत व आर्थिक उन्नती साधावी. तसेच, देवराईचे संवर्धन करावे, निसर्ग टिकवून पर्यावरणाचे रक्षण करावे व परप्रांतियांना जमिनी विकू नये, असे लोकोपयोगी मार्गदर्शन केले.