। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील चिंचवली-दूंद्रेजवळील चिंचवली बस स्टॅन्डजवळ रस्त्याच्या कडेला जाऊन कार पलटी झाल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर पाचजण जखमी झाले. राजवीर विक्रम सिंग (40), रा. ग्रीन एकर सोसायटी वाकडी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली.
शनिवारी (दि.9) रात्री दहाच्या सुमारास यातील मयत राजवीर सिंग हे त्यांच्या एर्टिगा कारमधून इतर सहा प्रवाशांसह दूंद्रेकडून पनवेलच्या दिशेने जात होते. रात्री दहाच्या सुमारास चिंचवली बस स्टॅन्ड जवळ त्यांचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. या झालेल्या अपघातात दोघेजण कारच्या बाहेर फेकले गेले. या अपघातात राजवीर सिंग हे गंभीर जखमी झाले. आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला तर अलोक लोखंडे, मजहर खान, कादर, रोहन नागपूरकर आणि शाहिद हे पाच जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत व्यक्ती तसेच अपघातातील जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाले होते. वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहन चालवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.







