शेतीसाठी ड्रोन वापरावर मिळणार अनुदान

तळा कृषी विभागाचे अर्ज करण्यासाठी आवाहन
| तळा | वार्ताहर |

शासनामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी, यासाठी विविध उपकरण अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून दिले जातात. नुकतीच फवारणीसाठी ड्रोन अनुदान योजना शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली.शेतीसाठी ड्रोनचा वापर करायचा असेल तर शेतकऱ्याला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे तळा कृषी विभागाकडून शेतकरी, कृषी पदवीधर व शेतकरी उत्पादक कंपनी यांना ड्रोन खरेदीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातले आहे. त्यामुळे शेतीची कामे अगदी सहजपणे आणि सोप्या पद्धतीने होण्यास मदत झाली आहे. ड्रोनचा वापर शेतीसाठी करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली गेली आहेत.परंतु ड्रोन खरेदीवर जर अनुदान मिळवायचे असेल तर आगोदर त्यासंबंधीची पूर्वसंमती घ्यावी लागणार आहे. तरच अनुदानाचा लाभ मिळणार आहे, असे धोरण आता कृषी आयुक्तालयाने ठरवले आहे. त्यामुळे आवश्यक त्या नियमाची पूर्तता करूनच ड्रोनची खरेदी करता येणार आहे.शेतकरी उत्पादक कंपन्या, विविध शेतकरी गट, कृषी पदवीधर किंवा व्यक्तगत शेतकरी यांना ड्रोन खरेदीवर अनुदान मिळणार आहे. यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. या सादर केलेल्या अर्जाना राज्य आणि केंद्र सरकारची परवानगी मिळाली तरच ड्रोन खरेदी करता येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना ड्रोनच्या साह्याने फवारणी करण्यासाठी सर्वप्रथम शासनामार्फत ड्रोन फवारणी करतेवेळी कशाप्रकारे हाताळावा याबद्दलची संपूर्ण माहिती व औषध फवारणी करतेवेळी कशाप्रकारे ड्रोन हाताळणी करावी, याबद्दलचा संपूर्ण प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

ड्रोनचा फायदे
ड्रोनचा वापर पिकांची पाहणी करण्यासाठी तसेच पिकांवरील रोगांची तपासणी करण्यासाठी करता येतो. पिकांवर फवारणी करण्यासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त क्षेत्रावर ड्रोनच्या मदतीने फवारणी करता येते. ड्रोनला लावलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने पिकांवरील किड रोगांची माहिती ठेवता येते.
किती अनुदान
विद्यापीठे व सरकारी संस्था 100 टक्के अनुदान (10 लाखांपर्यंत) शेतकरी उत्पादक संस्था 75 टक्के अनुदान (7 लाख 50000 रुपये अनुदान) कृषी पदवीधारकाने अवजारे सेवा केंद्र सुरु केल्यास पाच लाखांपर्यंत अनुदान इतर शेतकऱ्यांना 40 टक्के किंवा चार लाख अनुदान.
Exit mobile version