कार्लेखिंड ते सारळपूलाचे काम निकृष्ट

नव्या कोऱ्या रस्त्यावर पडल्या भेगा; एमएसआयडीसी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष


| अलिबाग | प्रतिनिधी |


कार्लेखिंड ते सारळपूल मार्गाच्या सुरू असलेल्या रस्ते कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. या रस्त्याचे अवघे 25 टक्क्यांपेक्षाही कमी काम पूर्ण झाले असताना नव्याने बांधलेल्या मार्गावर ठीकठिकाणी भेगा पडू लागल्याचे दिसून येत आहे. तसेच, या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मात्र, याबाबींकडे एमएसआयडीसी अधिकारी कानाडोळा करीत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरत असून, ग्रामस्थ आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड ते सारळपूल, सारळपूल ते अलिबाग बायपास व कार्लेखिंड ते वायशेत दरम्यान नवीन सिमेंट कॉक्रिट मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांसाठी 188 कोटी रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. एमएसआयडीसीच्या देखरेखीखाली हे काम सुरु आहे. सद्यस्थितीत कार्लेखिंड ते सारळपूल व कार्लेखिंड ते वायशेत दरम्यान काम ठेकेदाराने हाती घेतले आहे. मात्र, कार्लेखिंड ते सारळपूल मार्गाच्या सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सद्यस्थितीत या मार्गावर 25 टक्क्यांपेक्षा कमी काम पूर्ण झाले असताना नव्याने बांधलेल्या मार्गावर ठीकठिकाणी भेगा पडू लागल्या आहेत. रस्त्याचे काम पूर्ण केल्याच्या ठिकाणी साईटपट्टी टाकण्यात आलेली नाही. याशिवाय भर पावसातच रस्त्याचे काम सुरू असल्याने कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे बांधकाम साहित्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत काम सुरू ठेवणे योग्य आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून गुणवत्ता तपासावी, कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच, कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये असंतोष पसरत असून, ग्रामस्थ आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कार्लेखिंड ते सारळपूल मार्गाचे काम सुरू आहे. या कामांची वारंवार तपासणी करण्यात येत आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. जर मार्गावर कुठे भेगा पडल्या असतील तर त्या दुरुस्त करून घेण्यात येतील.

बी.के. सिंग,
निवासी अभियंता, एमएसआयडीसी
Exit mobile version