उपनगरीय रेल्वेच्या वेळापत्रकाला धक्का लावू नये

पनवेल प्रवासी संघाची रोखठोक भूमिका

| पनवेल | प्रतिनिधी |

वातानुकूलित उपनगरीय रेल्वे गाड्या पुन्हा एकदा सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभलेल्या या उपक्रमास शुल्क कमी केल्यानंतर प्रतिसाद मिळेल असे प्रशासनास वाटते. सेंट्रल लाईनवर अशा गाड्यांना पराकोटीचा विरोध होताना दिसून येतो. काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न देखील निर्माण झाला होता. या पाश्‍वर्र्भूमीवर जनरल रेल्वे पोलीस खात्याच्या पुढाकाराने स्टेशन मास्तर जयप्रकाश मीना यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल प्रवासी संघ आणि स्थानक सल्लागार समिती सदस्य यांच्या दरम्यान एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता स्टेशन मास्तर यांच्या दालनात सदर बैठक संपन्न झाली.

यावेळी प्रवाशांची भूमिका मांडताना पनवेल प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ.भक्ती कुमार दवे म्हणाले की, वातानुकूलित उपनगरीय गाड्यांचा यापूर्वीचा अनुभव फारसा उत्साहवर्धक नाही. गर्दीच्या वेळी उपनगरीय वातानुकूलित गाड्यांच्यात प्रवासी चढत नाहीत. पर्यायाने त्याच्या पुढील गाड्यांवरती गर्दीचा ताण येतो. वेळेत पोहोचण्याच्या उद्देशाने निघालेले प्रवासी अशावेळी दरवाज्यात लटकून प्रवास करत असतात. त्याचे पर्यावसन अपघातात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या मूळ वेळापत्रकाला धक्का न लावता वातानुकूलित गाड्या चालवाव्यात या मताचे आम्ही आहोत.

येऊ घातलेल्या गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे आणि उपनगरीय रेल्वे स्थानकांवर होणार्‍या गर्दीचे नियोजनाबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. पनवेल प्रवासी संघाच्या वतीने गणेशोत्सव स्पेशल गाड्यांचे नियोजनाबाबत प्रशासनास महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. जी आर पी तसेच आर पी एफ या दोन्ही खात्यांनी पनवेल प्रवासी संघ आणि स्थानक सल्लागार समितीच्या सदस्यांची भूमिका वरिष्ठानपर्यंत कळविण्याचे आश्‍वासन दिले आहे.

जी आर पी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी यांच्या पुढाकाराने सदर बैठक संपन्न झाली. या बैठकीला पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भक्ती कुमार दवे, स्थानिक सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य यशवंत ठाकरे, आर पी एफ चे वरिष्ठ निरीक्षक राणा, स्टेशन मास्तर (कमर्शियल) सुधीर कुमार, निलेश जोशी, डॉक्टर मधुकर आपटे, सरिता पाटणकर,संतोष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version