| पेण | प्रतिनिधी |
सोबती संस्थेच्या माध्यमातून गेल्या 19 वर्षे शालेय साहित्य वाटप होत असून, या वर्षीदेखील ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बापूसाहेब नेने यांनी सांगितले की, यशाला कोणताच शॉर्टकट नसतो. धैर्य, चिकाटी व प्रामाणिकपणे काम केल्यास आपले उद्दिष्ट सफल होते. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर कठोर मेहनत घेतल्यास यश आपोआप तुमच्या पायाशी येईल. मात्र, मेहनत करणे गरजेचे आहे. मेहनत करणाऱ्यांच्या मागे सोबती संघटना नेहमीच ठामपणे उभी राहते. आतापर्यंत सोबतीची धुरा मी सांभाळत होतो. परंतु यापुढे मंगेश, नीता, निलेश यांसारखे तरूण मंडळी सांभाळणार आहेत. माझा यांच्याकडे बारीक लक्ष असेल. भविष्यात सोबती संघटनेचे काम थांबले जाणार नाही ते अविरतपणे सुरूच राहील.
शेतपळस, आमटेम जिल्हा परिषद, कोकण एज्युकेशन वढाव, खारजुई जिल्हा परिषद, जय किसान विद्या मंदिर वडखळ, जिल्हा परिषद वडखळ, बोरी जिल्हा परिषद येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच छत्री व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सोबतीचे मा. अध्यक्ष बापूसाहेब नेने, शुभांगी नेने, बापूसाहेब आठवले, ॲड. नीता कदम, निलेश म्हात्रे आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.