स्त्री शक्तीच्या पाठपुराव्याला यश

| पनवेल | प्रतिनिधी |

कळंबोली येथील सेक्टर-5 ई मधील ओंकार ओनर्स असोसिएशन (केएल-1) परिसरात उघड्यावर पडून असलेली धोकादायक वीज केबल अखेर जमिनीत टाकण्यात आली आहे. स्त्री शक्ती फाऊंडेशन व विजया कदम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महिनाभर रखडलेले हे काम पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महावितरणने सुमारे महिनाभरापूर्वी या परिसरात नवीन वीज केबल टाकली होती. मात्र, ही केबल जमिनीत पुरण्याऐवजी रस्त्यावरच उघडी ठेवण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठा अडथळा निर्माण होत होता. त्यातच उंदरांनी केबल कुरतडल्याने पावसाळ्यात वीज प्रवाहामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता. या गंभीर समस्येबाबत रहिवाशांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात होती.

दरम्यान, येथील रहिवासी गणेश रणदिवे यांनी ही बाब विजया कदम यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी स्थानिक वीज कर्मचारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सलग आठ दिवस सातत्याने पाठपुरावा केला. अखेर महावितरणने रखडलेले काम हाती घेत उघड्यावर पडलेली वीज केबल जमिनीत टाकून सुरक्षित केली. याशिवाय परिसरातील जुने व तुटलेले तीन ते चार वीज वितरण पेटारे (डीपी बॉक्स) पुढील चार ते पाच दिवसांत दुरुस्त करून सुरक्षितरीत्या बंदिस्त करण्यात येतील, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Exit mobile version