दिव्यांगांच्या लढ्याला यश

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील रासळ येथील दिव्यांग बांधवांच्या तीव्र संघर्षानंतर अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे. हक्काच्या 5 टक्के निधीसाठी मंगळवारी (दि.9) पुकारण्यात येणारे सामूहिक उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित झाले होते. या घडामोडींनंतर तत्परता दाखवत रासळ ग्रामपंचायतीतर्फे सर्व दिव्यांग नागरिकांना त्यांच्या हक्काच्या निधीचे थेट बँक खात्यात तर दोघांना चेक देऊन वाटप करण्यात आले आहे. निधी मिळाल्याने दिव्यांग नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

रासळ येथील 23 दिव्यांग रहिवाशांनी सन 2024-25 या आर्थिक वर्षातील निधी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व बिले मार्च 2026 मध्येच जमा केली होती. मात्र, अडीच ते तीन महिने उलटूनही निधी न मिळाल्याने संतप्त दिव्यांगांनी थेट कोकण आयुक्तांपर्यंत धाव घेत मंगळवार दि.9 जूनपासून ग्रामपंचायत कार्यालयातच उपोषणाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. सोमवारी (दि.8) प्रशासनाने दिव्यांग प्रतिनिधींना निधी देण्याचे ठोस आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता मंगळवारी प्रत्यक्ष निधी वर्ग करून करण्यात आली. त्यामुळे दिव्यांगांवर उपोषणाला बसण्याची आलेली वेळ टळली असून, संपूर्ण सुधागड तालुक्यातून या यशस्वी लढ्याचे कौतुक होत आहे.

Exit mobile version