कृत्रिम तलावातून मगरीला काढण्यात यश

नागरिकांनी सोडला सुटकेचा श्‍वास

| आगरदांडा | प्रतिनिधी|

मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यालगत असणार्‍या चिकणी पुलाजवळील कृत्रिम तलावातून मगरीला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

चिकणी गावापासून काही अंतरावर मुख्य रस्त्यालगत पुलाजवळील शेजारी कृत्रिम तलावात मगर वास्तव्य करीत असल्याचे नागरिकांनी पाहिल्यानंतर याठिकाणचे ग्रामस्थ भयभीत झाले होते. ही माहिती मिळताच सर्पमित्र संदीप घरत यांनी याठिकाणी जाऊन पाहणी केली असता, त्यावेळी नदीच्या पाण्यातून मगर तलावाकडे जाताना दिसली. त्यांनी तलावात दोन पाण्याचे पंप लावून पाणी कमी करण्याचा प्रयत्न केला; परंतु पाण्याचा प्रवाह कमी होत नसल्याने मगर काढण्यात अपयश येत होते. अखेर ठाणे येथील मानद वन्यजीव रक्षक व डब्ल्यूडब्ल्यूए संस्थेला प्राचारण करण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर मगरीला तलावातून सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. ही मगर 45 इंच लांब असून रूंदी 7 इंच आहे. तिचे वजन सात किलो असून, चार वर्षांची असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुदर्शन पाडावे यांनी सांगितले. तिला महाड येथील सावित्री नदीत सोडण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकारी यांनी दिली.

यावेळी मुरुड तहसीलदार रोहन शिंदे, वनक्षेत्रपाल मनोज वाघमारे, मानद वन्यजीव रक्षक ठाणे रोहित मोहिते, डब्ल्यूडब्ल्यूए सदस्य अभिजीत मोरे, वनपाल विजय कोसबे, सर्पमित्र संदीप घरत, वनपाल संपोष रेवणे, वनरक्षक पंढरीनाथ दिघे आदींसह वन अधिकारी, वन्यजीव रक्षक यांनी मोलाची कामगिरी बजावली.

Exit mobile version