| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील मोहो गावात पार्किंगची सोय अपुरी असल्याने तलावाभोवती अनेक जण वाहन पार्किंग करतात. मात्र, हीच सवय एका वाहनचालकासाठी चांगलीच धोकादायक ठरली. हँडब्रेक न लावता पार्किंग केलेली प्रवासी इको गाडी थेट खोल तलावात कोसळली.
या घटनेची माहिती समजताच परिसरात मोठी गर्दी झाली. ग्रामस्थांच्या मदतीने आणि जेसीबीच्या सहाय्याने सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर गाडी तलावातून बाहेर काढण्यात आली. पार्किंग केलेली प्रवासी गाडी थेट तलावात कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, वाहनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गावातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या या तलावाभोवती सुरक्षा कठडे नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे. रस्ता वळणदार असल्याने विशेषतः नवीन वाहन चालकांना वळणाचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढते. तलावाभोवती सुरक्षा कठडे उभारणे अत्यंत गरजेचे आहे. मोठी दुर्घटना घडण्याआधी प्रशासनाने तातडीने कठडे उभारावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.







