। खोपोली । प्रतिनिधी ।
मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटात सर्वसामान्य जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा जीवाची पर्वा न करता कामाला लागली होती. या दरम्यान यातील अधिकारी वर्गासह कामगार कर्मचारी हे कोरोना बाधित होऊन मृत्यूझाले होते. त्यामुळे शासनाने या युद्धपातळीवर कार्यरत असणार्या शासकीय घटकांना 50 लाखाची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र त्याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न केले जात होते. खालापूर तालुक्यात वडगाव ग्रामपंचायतीचे घंटागाडी वरील चालक कामगार मारुती तुकाराम पारींगे यांना पहिल्या लाटेतच सेवा करीत असताना कोरोनाने गाठले. आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबाना मदत मिळावी यासाठी शासनाकडे खालापूर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करुन पाठपुरावा केल्याने त्याच्या कुटुंबाना 50 लाखाची मदत त्याची पत्नीच्या खात्यावर जमा झाल्याने संघटने पाठपुराव्याला यश मिळाले आहे. त्यांच्या कुटुंबाला भक्कम आधार मिळाल्याने संघटने मार्फत समाधान व्यक्त केले आहे. रायगड जिल्ह्यातील पाच जणांना ही रक्कम मिळाल्याची माहिती संघटनेने दिली आहे.