महामार्ग पोलिसांची मृत्युंजयदूत योजनेला यश

वाकण मदत केंद्रातील हद्दीत अपघाती मृत्यूमध्ये 50 टक्के घट
2020 मध्ये 23 प्राणांकीत अपघातात 28 जणांचा मृत्यू, तर
2021 मध्ये 14 प्राणांकीत अपघातामध्ये 14 जणांचा मृत्यू
नागोठणे | वार्ताहर |
महामार्ग पोलिसांच्या वाकण मदत केंद्रातील हद्दीत अपघाती मृत्यूमध्ये 50 टक्के घट झाल्याची माहिती महामार्ग पोलीस वाकण मदत केंद्रातील पोलीस उपनिरीक्षक परशुराम भोईर यांनी दिली. महामार्ग पोलीस राबवित असलेल्या मृत्युंजयदूत योजनेला यश आल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील महामार्ग पोलिसांच्या वाकण मदत केंद्राची हद्द वडखळ ते इंदापूर आणि राज्य महामार्ग क्रमांक 548 ए वाकण ते दुरशेत अशी 79 कि.मी. असून, सन 2020 च्या तुलनेत या हद्दीतील माहामार्गावर घडलेल्या अपघातातील मृत्यू होणार्‍यांचा आकडा सुमारे 50 टक्के घटल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सन 2020 मध्ये 23 प्राणांकीत अपघात झाले असून, त्यामध्ये 28 जण मृत्युमुखी पडले होते, तर सन 2021 मधील प्राणांकीत अपघाताच्या प्रमाणामध्ये सुमारे 50 टक्के घट होऊन 14 प्राणांकीत अपघातामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर अपघातांमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे.
तसेच सन 2021 मध्ये वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या वाहन चालकांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याचे दिसून येत आहे. सन 2021 मध्ये 38 हजार 798 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यामधून एक कोटी 65 लाख 14 हजार आठशे रुपये दंड आकारण्यात आला आहे.
महामार्गावर नियमितपणे गस्त, वाहन चालकांमध्ये करण्यात आलेली जनजागृती, अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली हायवे मृत्युंजय दूत योजना याचाच एकत्रित परिणाम म्हणून महामार्ग पोलीस केंद्र वाकणच्या हद्दीमध्ये प्राणांकीत अपघातांच्या प्रमाणामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत निम्म्यापेक्षा घट झालेली आहे.

Exit mobile version