। खरोशी । वार्ताहर ।
सुहित जीवन ट्रस्ट संचालित सुमंगल बौद्धिक अक्षम मुलांची शाळा आणि एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र पेण येथील विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि.17) विलेपार्ले येथील जमनाबाई नरसी स्कूल येथे झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. या स्पर्धेमध्ये रायगड आणि मुंबईच्या 41 शाळांचा सहभाग होता. स्पर्धेत घेतलेल्या विविध क्रीडा प्रकारांमध्ये 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, जागेवर उडी, गोळाफेक, लांब उडी आणि चमचा लिंबू अशा स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धेत सुमंगल शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कार्य केले. यामध्ये सिद्धिका पाटील हिने 50 मी. धावणे व वैष्णवी शेवाळे हिने 100 मी. धावणे या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. आर्या पाटील हिने 100 मीटर धावणे या स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. तसेच, मनीष म्हात्रे व तन्मय लांगी यांनी 100 मीटर धावणे या स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे.