। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुका शिक्षण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तालुक्या स्तरीय व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत कळंब शालेच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी समूह गानमध्ये लहान गटात दुसरा आणि मोठ्या गटात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
रायगड जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्ह्यात तालुका स्तरावर विद्यार्थ्यंसाठी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या तालुका स्तरीय स्पर्धा कर्जत शहरातील महिला मंडळाच्या विद्या विकास मंदिर शाळेत रंगल्या होत्या. या स्पर्धेत तालुक्यातील 27 केंद्रांमध्ये आणि नंतर 6 बिट पातळीवरून झालेल्या स्पर्धेतील पहिल्या 3 क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना तालुक्या स्तरीय व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत सहभाग देण्यात आला होता. या स्पर्धेत कळंब मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत गायन स्पर्धेतील लहान गटांमध्ये द्वितीय क्रमांक आणि मोठ्या गटामध्ये तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.






