जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कर्जतच्या स्पर्धकांचे यश

| कर्जत । वार्ताहर ।
रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने कर्जत तालुका बुद्धिबळ संघटनेने विश्‍वनाथन यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या 13 व 17 वर्षां आतील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये 13 वर्षांच्या आतील गटात अथर्व वाघ (अलिबाग) प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये कर्जतच्या ज्ञानदा गुजराथी हिने आणि 17 वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये नेरळच्या शंतनू राऊत तर मुलींच्या गटात श्‍वेता चौरे कर्जत हिने अजिंक्यपद पटकावले.

शहरातील हनुमान मंदिराच्या सभागृहामध्ये जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास म्हात्रे आणि तालुकाध्यक्ष संजीव ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी अंकित जोशी, डॉ. प्रथमेश अळसुंदेकर आदी उपस्थित होते. दोन्ही गटात अलिबाग, खालापूर, पनवेल, कर्जत आदी तालुक्यातील एकूण 94 स्पर्धक सहभागी झाले होते. सार्थक मिंडे, कपिल कोलंबकर, यश हूंगुंड यांनी पंच म्हणून कामगिरी केली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ डॉ. अनिरुद्ध जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.

Exit mobile version