मिनिडोअर संघटनेच्या आंदोलनाला यश

खड्डे बुजवण्यास ठेकेदाराकडून सुरवात

| महाड | वार्ताहर |

महाड तालुक्यातील खाडीपट्टा भागातील कोकण श्रमिक संघ मिनिडोअर चालक-मालक संघटना यांनी राजेवाडी फाटा ते चिंभावे फाटा या रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु तरीही याकडे प्रशासनाने गांभीर्याने न पाहिल्याने कोकण श्रमिक संघ मिनिडोअर चालक-मालक संघटनेने तसेच या भागातील 20 हून अधिक गावातील नागरिकांनी एकत्र येत रावढळ येथे रास्ता रोको केला. कोकण श्रमिक संघ मिनिडोअर चालक-मालक संघटने या आंदोलनाची तातडीने दखल घेत महामार्ग विभागाने दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या भागातील राजकीय पक्षाचे पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील महाड राजेवाडी फाटा ते रत्नागिरी जिल्ह्यातील अंबडवे गावांना जोडणारा नवीन महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या जुन्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम देखील रखडले आहे. हा रस्ता महाड तालुक्यातील खाडीपट्टा भागातूनही जातो. या खाडीपट्टी विभागातून खासगी वाहतूक रिक्षा तसेच विक्रम रिक्षा वाहतूक, एसटी व इतर वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात सुरू असते. नवीन महामार्ग होत असल्याने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या रखडले आहे. यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे अवघड होत आहे. रस्त्याची दुरुस्ती रखडल्याने त्याचा मोठा फटका रिक्षा वाहतूक व विक्रम रिक्षा वाहतूकदारांना होत आहे त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी असे पत्र महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंताना दिलेले होते. 10 मे पर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर रावढळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा खाडीपट्टा विभाग अध्यक्ष फिरोज देशमुख व सचिव मिलिंद घाणेकर यांनी दिला होता, परंतु याकडे वेळीच लक्ष दिले न गेल्याने अखेर गुरुवार (दि.11) संघटनेने येथे सकाळी रास्ता रोको सुरु केले. याला सव, गोठे, तुडील, रावढळ, वामने, जुई या परिसरातील 20 हून अधिक गावातील नागरिकांनीही प्रतिसाद दिला.

मिनिडोअर संघटनेचे खाडीपट्टा विभाग अध्यक्ष फिरोज देशमुख, रिहान देशमुख, सुनील जाधव, ईब्राहीम झमाने, मन्सुर देशमुख, अरिफ देशमुख, सोमनाथ ओझरडे यांच्या सह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. अखेर या आंदोलनाची तातडीने दखल घेत महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम, अभियंता अभिजीत झेंडे व पोलीस अधिकारी यांनी आंदोलकांशी चर्चा केली व आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर या रस्त्यावरील दुरुस्तीही सुरु करण्यात आली आहे.

Exit mobile version