नगरसेवकपदाच्या 20 जागांपैकी 17 जागांवर महाविकास आघाडीचा झेंडा
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांचा बहुमताने विजय
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसच्या उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले. मागील अनेक वर्षाची वर्चस्वाची परंपरा शेकापने कायमच ठेवली. नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी 17 जागां शेकापच्या हातात आल्या असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक या बहुमतांनी निवडून आले. विरोधकांच्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाल्याचे दिसून आले. एक वेगळा उत्साह या निमित्ताने अलिबागमध्ये दिसून आला.
अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नाईक होत्या. त्यांनी मतमोजणीत सुरुवातीपासूनच आघाडी मारत भाजपच्या तनुजा पेरेकर यांना धुळ चारली. शेकापच्या अक्षया नाईक यांना आठ हजार 974 मते मिळाली असून भाजपच्या तनुजा पेरेकर यांना दोन हजार 334 मतांमध्ये समाधान मानावे लागले. पेरेकर यांचा दारुण पराभव झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाक्यांच्या आतषबाजीसह लाल धुरळा सर्वत्र उडविण्यात आला. प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वावर खुश होऊन अलिबागकरांनी शेतकरी कामगार पक्षाच्या हाती नगरपरिषदेची सुत्रे दिली. एक वेगळा उत्साह या निमित्ताने पहावयास मिळाला. ‘शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो’, असा जयघोष करीत विजयाचा आनंद कार्यकर्त्यांनी मनमुरादपणे लुटला. नगरसेवक पदाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी यश संपादन करून विजय आपल्या हाती कायम ठेवला. प्रभाग दोनमधील नगरसेवक पदाचे उमेदवार प्रशांत नाईक बिनविरोध निवडून आले. तर अन्य 16 असे एकूण 17 नगरसेवक पदाचे उमेदवार जिंकून आले.
त्यामध्ये प्रभाग एकमधील संतोष मधूकर गुरव यांना 546 मते मिळाली आहेत. संध्या शैलेश पालवणकर यांना 782 मते मिळाली आहेत. प्रभाग दोनमधील उमेदवार सुषमा नित्यानंद पाटील यांना 657 मते मिळाली आहेत. प्रभाग तीनमधून ॲड. साक्षी गौतम पाटील यांना 833 मते मिळाली आहेत. आनंद अशोक पाटील यांना 902 मते मिळाली आहेत. प्रभाग पाचमधील ॲड. निवेदिता राजेंद्र वाघमारे यांना एक हजार 136, समिर मधूकर ठाकूर यांना एक हजार 233 मते मिळाली आहेत. प्रभाग सहामधील ॲड. ऋषीकेश रमेश माळी यांना 396, ॲड.अश्वीनी ठोसर यांना 376 मते मिळाली आहेत. प्रभाग सातमधील ॲड. मानसी संतोष म्हात्रे यांना 786 मते मिळाली. प्रभाग आठमधील ॲड. निलम किशोर हजारे यांना 776, अनिल रमेश चोपडा यांना 688 मते मिळाली. प्रभाग नऊमधील योजना प्रदिप पाटील यांना एक हजार 141, सागर शिवनाथ भगत यांना 840 मते मिळाली आहेत. प्रभाग दहामधील शैला शेषनाथ भगत यांना 759 व वृषाली महेश भगत यांना 934 मते मिळाली आहेत. तसेच प्रभाग चारमधील उमेदवार रेश्मा थळे यांना 391, महेश शिंदे यांना 532 आणि प्रभाग सातमधील उमेदवार अभय म्हामुणकर यांना 529 मते मिळाली. या निवडणुकीत शिंदे गटातील उमेदवार विजया पार्सेकर, कृष्णनाथ चाळके, तसेच अपक्ष उमेदवार उमा आठवले यांचा डिपॉजिट जप्त झाले आहे. त्यामुळे शिंदे गटातील उमेदवारांना चांगलाच दणका मिळाला असल्याचे चित्र दिसून आले.
शेकापचे नेते जयंत पाटील यांची उपस्थिती
सकाळी दहा वाजता निकालाला सुरुवात झाली. जसजसा निकाल जवळ येत होता. तसतसा, कार्यकर्ते मतमोजणीच्या ठिकाणी जाऊ लागले. मतमोजणी केंद्रापासून काही अंतरावर जल्लोष केला. शेकापचे नेते जयंत पाटील यांनी देखील त्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. विजयी उमेदवारांना भेटून त्यांचे अभिनंदन केले. पराभुत झालेले शेकापचे उमेदवारांची विचारपूस करून त्यांना पुन्हा नव्याने उभे राहण्याचे बळ दिले. यावेळी शेकाप नेते शंकरराव म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, काँग्रेसचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सूनील थळे, काका ठाकूर, रविंद्र ठाकूर, ॲड. प्रवीण ठाकूर, तसेच पिंट्या तथा अमिर ठाकूर, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, अनिल पाटील आदी वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अलिबाग झाले लालेलाल

अलिबाग नगरपरिषदेच्या वीस नगरसेवकपदांच्या जागांपैकी 17 जागांवर महाविकास आघाडीचे शेकाप काँग्रेसच्या उमेदवारांनी वर्चस्व कायम ठेवले. तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक या भरघोस मतांनी निवडून आल्या. त्यावेळी जल्लोष साजरा करण्यात आला. स्टेट बँक इंडियापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल ताशांसह डिजेमधील गाण्यांच्या ठेक्यावर अनेकांचे पाय थिरकले. लाल रंगाची उधळण कार्यकर्त्यांनी केली. संपुर्ण शहर लालेलाल झाला. अक्षया नाईकससह महाविकास आघाडीच्या शेकाप व काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचे अलिबागकरांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.काहींनी औक्षण केले. काहींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. काहींनी रंगाची उधळण केली. तर काही जण हातात लाल बावटा व काँग्रेसचा झेंडा घेऊन फिरकत होते. एक वेगळा उत्साह या निमित्ताने पहावयास मिळाला. ही रॅली मारुती नाका, बालाजी नाका, महावीर चौक, ते शेतकरी भवनपर्यंत काढण्यात आली. अखेर या रॅलीचे रुपांतर सभेमध्ये झाले. हजारो कार्यकर्ते शेकाप भवन परिसरात जमले होते.







