पोलादपूर येथे उडान फेस्टिव्हल उत्साहात
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने आयोजित उडान फेस्टिव्हल दि. 24 जानेवारी 2026 रोजी सुंदरराव मोरे आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेज, पोलादपूर येथे उत्साहात पार पडला. या महोत्सवात मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता.
यामध्ये माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे महाविद्यालय, माणगांव येथील एकूण 29 विद्यार्थ्यांनी पाचही स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे पथनाट्य व पोवाडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तसेच सर्जनशील लिखाण या स्पर्धेत दिव्यानी मालुसरे हिने प्रथम क्रमांक, तर वक्तृत्व स्पर्धेत राज संदेश ओव्हाळ याने तृतीय क्रमांक मिळवत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. या यशस्वी पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन सहा. प्रा.पंकज गायकवाड यांनी केले असून, त्यांना सहा. प्रा. मंजीरी सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयाची सांस्कृतिक प्रतिनिधी सानिया जाधव (तृतीय वर्ष, विज्ञान शाखा) हिने पोवाडा रचनेत तसेच विद्यार्थ्यांकडून तो प्रभावीपणे सादर करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या घवघवीत यशाची दखल घेत मुंबई विद्यापीठाने दि.17 फेब्रुवारी 2026 रोजी उडान महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरावर आमंत्रित केले आहे. तसेच, दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा सादर करण्यासाठी मुंबई विद्यापीठात विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड. राजीव अशोक साबळे, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. खामकर, उपप्राचार्य डॉ. आचार्य, डॉ. पाण्डेय जे. आर., डॉ. संगिता गंगाराम उतेकर (ग्रंथपाल), आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख तसेच विज्ञान विभाग प्रमुख सहा. प्रा. मेहरीन डावरे, आणि सदस्य सहा. प्रा. देवांक परब, विशाखा पवार, अश्विनी शेलार, श्वेता सकपाळ, तेजस्विनी आचार्य, निहाल वलीले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
