मिनीडोअरच्या वयोमर्यादेत वाढ; आ.जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

परिवहन मंत्र्यांचा निर्णय
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
हिवाळी अधिवेशनात शेकपक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी मिनिडोअर संघटनेचा प्रश्‍न उपस्थित करत त्यानुसार मिनिडोअरची वयोमर्यादा वाढून देण्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांना वयोमर्यादा वाढविण्यास भाग पाडले. आ. जयंत पाटील यांनी विधिमंडळात रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण व कर्जत तालुक्यातील नवीन नियमानुसार लागू करण्यात आलेल्या सरसकट प्रवाशी मिनीडोअर टॅक्सी वाहनाच्या वयोमर्यादेस मुदतवाढ अथवा स्थगिती मिळण्याची जोरदार मागणी केली होती. त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते की, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण व कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विशेष ग्रामीण भागातील प्रवाशी मिनीडोअरने (टॅक्सीने) प्रवास करतात त्यामुळे तेथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झालेला असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्‍न सुटलेला आहे. परंतु शासनाने रायगड जिल्ह्यातील ग्रामिण भागातील अलिबाग, पेण व कर्जत तालुक्यातील नविन एम.एम.आर.डी.ए. क्षेत्राला शहरी भागाचे परिवहन विभागाचे एम.एम.आर.टी.ए.चे नियम व अटी माहे जून 2021 पासून लागू करण्यात आल्यामुळे त्यात असलेल्या वाहनांच्या वयोमर्यादेच्या नवीन नियमामुळे अलिबाग, पेण व कर्जत तालुक्यातील सर्रास सर्वच मिनीडोअर टॅक्सींना हे नवीन नियम लागू होत असल्यामुळे मालक,चालक यांच्या समोर नवीन प्रश्‍न निर्माण झालेला आहे.


कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे मिनीडोअर (टॅक्सी) मालक, चालक मागील दोन वर्षापासून शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांची जमापुंजीच संपलेली आहे. तसेच बँक लोन, खाजगी कर्ज किंवा उसनवारी घेऊन सध्या मिनीडोअर (टॅक्सी) मालक, चालक यांना आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करावे लागत आहेत. त्यातच निसर्ग चक्रीवादळ, तैक्ते चक्रीवादळ, अतिवृष्टी, महापूर यामुळे बागा, शेती नष्ट झालेल्या आहे. त्यामुळे शासनाने लागू केलेली वाहन वयोमर्यादेच्या अटीनुसार मिनीडोअर (टॅक्सी ) तोडण्यात येवू नयेत अशी मागणी आ जयंत पाटील यांनी केली होती. शासनाने लागू केलेल्या नियमामधील वाहनाच्या वर्योमर्यादेच्या नियम व अटींना मिनोडोअर (टॅक्सी) मालकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, व कर्जत तालुक्यातील ग्रामिण भागाचे विकास व शहरीकरण झाल्यावरच सदर नियम व अटी लागू करण्याची आवश्यकता आहे.


त्यामुळे मिनीडोअर (टॅक्सी) मालक, चालक यांच्या कुटुंबायांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून रायगड जिल्ह्यातील नविन एम.एम.आर.डी.ए. क्षेत्राला शहरी भागाचे परिवहन विभागाचे एम.एम.आर.टी.ए. चे वयोमर्यादा व इतर जाचक नियम व अटी रद्द करण्यात याव्यात अथवा तीन वर्षाकरिता सरसगट मिनीडोअर टॅक्सी वाहनांची वयोमर्यादा वाढविण्यात यावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली होती. या मागणीची दखल घेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी मिनिडोअरची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल आ. पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर मिनिडोअर संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे. याबद्दल मिनिडोअर संघटनांनी आमदार जयंत पाटील यांची भेट घेत त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी मिनिडोअर संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक मोरे (रेवस) मधुकर ठाकूर सेक्रेटरी वावे आणि इतर चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version