नरेश गायकवाडांच्या प्रयत्नांना यश

। पाली । वार्ताहर ।

खुरावले फाटा ते वाघोशी या रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेबाबत ऑल इंडिया पँथर संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी केलेल्या पाठपुरवठ्याला अखेर यश आले आहे. उशिरा का होईना ठेकेदाराला शहाणपण सुचले असून खड्डे पडलेल्या ठिकाणी डांबर कार्पेट मारण्यात आले आहे.

खुरावले फाटा ते वाघोशी या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत केलेल्या रस्त्याची पहिल्याच वर्षी दुरावस्था झाली होती. अतिशय निकृष्ठ दर्जाचे काम, ठेकेदाराकडून कामात दिरंगाई, प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळेच खुरावले फाटा ते वाघोशी हा रस्ता एक वर्षसुध्दा नीट काढू शकला नाही. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी व पत्रकार यांनी रस्त्याच्या निकृष्ठ कामाबाबत वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले परंतु याकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले.

वर्षभरापूर्वी रस्त्याच्या काही ठिकाणी ठेकेदाराकडून खडी डांबर टाकून खड्डे भरण्यात आले होते. मोठ्या प्रमाणावर खराब झालेल्या ठिकाणी कार्पेट मारून देण्याचे आश्‍वासन ठेकेदाराकडून देण्यात आले होते. परंतु, त्यांच्या वचनपूर्तीला एक वर्ष लोटले. हे काम पावसाळ्याआधी व जलदगतीने व्हावे यासाठी नरेश गायकवाड हे सतत प्रयत्नशील राहिले. मात्र, ठेकेदार व प्रशासनाकडून वेळकाढूपणा करण्यात आला. अखेर नरेश गायकवाड यांच्या माध्यमातून प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. याचीच दखल घेत ठेकेदाराकडून गुरूवारी (दि.13) रस्त्यावर कार्पेट मारण्यास सुरुवात करण्यात आली.

Exit mobile version