। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने 24 मे 2023 रोजी पदभार स्विकारला होता. येत्या 24 तारखेला विद्यमान संचालक मंडळाच्या कारभाराची वर्षपूर्ती होत आहे. बाजार समितीच्या आवारामध्ये संचालक मंडळाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला असता या मंडळाचे पहिले वर्ष बर्याच अंशी यशस्वी राहिले असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यप्रणालीमुळे शेतकरी बांधव, व्यापारी, कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात समाधानाचे वातावरण पाहायला मिळते.
माजी आ. विवेक पाटील यांच्या आशीर्वादाने तर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील व माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या खमक्या मार्गदर्शनाने तसेच सुप्रसिद्ध उद्योगपती तथा माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे व शेकाप पनवेल विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष काशिनाथ पाटील यांच्या सहकार्याने विद्यमान संचालक मंडळाची बिनविरोध निवड मागच्या वर्षी झाली होती. शेतकरी कामगार पक्षाचे माजी तालुका चिटणीस नारायण घरत हे सभापतीपदी विराजमान झाले तर सुनील सोनावळे यांची उपसभापती नियुक्ती करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून देवेंद्र गंगाराम मढवी, सुभाष हरिभाऊ पाटील, सखाराम गंगाराम पाटील, महादू गोपाळ पाटील, बाळकृष्ण नारायण पाटील, मच्छिंद्रनाथ गणा पाटील, अर्जुन पांडुरंग गायकर, अशोक गणू गायकर, प्रताप चंद्रकांत हातमोडे, रामचंद्र आत्माराम पाटील, देवेंद्र अनंत पाटील, आतिश दत्ता पाटील, सोमनाथ जनार्दन पाटील, दिनेश ज्ञानेश्वर महाडिक आणि सौ ललिता गोपीनाथ फडके असे पंधरा संचालक पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक झाले. म्हणूनच एकूण 17 संचालक असणार्या या मंडळाने सुरुवातीचे दोन महिने एकंदरीत कामकाज व बाजार समितीचे नियम-निकष समजून घेण्यावर भर दिला. त्यानंतर सभापती नारायण घरत यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीचे आवारातील संबंधित शेतकरी बांधव, व्यापारी व कर्मचार्यांच्या स्वतंत्र बैठका घेत त्यांचेे प्रश्न जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
विद्यमान संचालक मंडळाचे उल्लेखनीय कार्य म्हणजे महाराष्ट्रातील अन्य बाजार समित्यांमधील कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे. परंतु पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचार्यांना पाचवा वेतन आयोग लागू होत असल्यामुळे त्यांना अल्प मोबदल्यावर नोकरी करावी लागते. या गोष्टीची सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन विद्यमान संचालक मंडळाने कर्मचार्यांना भरीव सानुग्रह अनुदान दिले होते. विद्यमान संचालक मंडळाच्या या निर्णयाने कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
विशेष प्रशंसनीय म्हणजे विद्यमान संचालक मंडळाने शेतकरी, व्यापारी, आडते, कर्मचारी यांच्यासोबत उत्तम समन्वय राखल्याने मागील वर्षीच्या तुलनेत बाजार समिती उत्पन्नामध्ये चालू वर्षात भरीव वाढ झाली आहे. या संचालक मंडळाने आगामी वर्षांमध्ये मुख्य कार्यालयाच्या शेजारील पॅडी मार्केट इमारतीच्या ठिकाणी सुसज्ज शॉपिंग सेंटर कार्यान्वित करण्याचा मानस ठेवला आहे.
विद्यमान संचालक मंडळाच्या वतीने माननीय रायगड जिल्हाधिकारी, माननीय आयुक्त पनवेल महानगरपालिका आणि सिडको व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे पत्रव्यवहार करून अतिरिक्त 50 एकर जागेची मागणी केली आहे. ही जागा उपलब्ध झाल्यानंतर सर्व सोयीयुक्त निर्यात भवन उभारण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. तसेच फळांवर प्रक्रिया करणारी मशिनरी, आधुनिक प्रकारच्या सुसज्ज यंत्रणा, अत्याधुनिक सोयी सुविधा आदींनी युक्त हाय टेक बाजार आवार निर्माण करण्याचे ध्येय विद्यमान संचालक मंडळाने समोर ठेवले आहे.