| खोपोली | प्रतिनिधी |
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी ही देशासमोरील गंभीर समस्या बनली आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था अधिकच बिकट होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतो. या पार्श्वभूमीवर स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावी उपाय शोधण्याच्या उद्देशाने मिशन पॉटहोल फ्री इंडिया अंतर्गत खोपोली येथील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे भरून त्याची प्रत्यक्ष चाचणी घेण्याचा प्रायोगिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमात जीएसपीएल-मेलीकाचे संचालक अस्लम लोगडे यांनी विकसित केलेल्या विशेष दुरुस्ती साहित्याचा वापर करण्यात आला. सिमेंट काँक्रीट तसेच डांबरी रस्त्यांवरील खड्डे मुसळधार पावसातही प्रभावीपणे भरता येतात, याची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. प्रतिकूल हवामानात या उत्पादनाची कार्यक्षमता तपासणे आणि नागरिकांसमोर त्याचे प्रात्यक्षिक सादर करणे हा या प्रयोगामागील मुख्य उद्देश होता. या उपक्रमासाठी हेल्प फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला. खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, उद्योजक अतिक खोत, अश्पाक लोगडे, मेलीका टीम तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी खोपोली नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेविका सानिया शेख, प्रतीक्षा रेटरेकर, अश्विनी अत्रे तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
