श्रम, वेळ, पैसा व मनुष्यबळ यांची होते बचत
। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील चिरनेर मधीलपाडा येथे राहणार कृषीमित्र शेतकरी प्रफुल्ल काळूराम खारपाटील व प्रयोगशिल शेतकरी बाळकृष्ण धनाजी मोकल यांनी यावर्षी मौजे चिरनेर येथील त्यांच्या भात खाचरातील शेतात एका एकरात टोकन पद्धतीने यशस्वी लागवड करुन घेतली आहे.
त्यांना अवघे 10 किलो बियाणे लागले. तर या पेरभात टोकन पद्धतीसाठी त्यांना केवळ 10 मजुर लागले. तसेच त्यांच्या दुसर्या एका शेतात या दोन्ही शेतकर्यांनी ड्रम सिडरच्या सहाय्याने पेरणी करुन घेतली यासाठी त्यांना 20 किलो बियाणे पेरणीसाठी लागले. पारंपारिक पद्धतीने शेतीमध्ये शेतात शेण, पालापाचोळा आदींचा राब करुन त्यानंतर नांगराच्या किंवा पॉवर टिलरच्या सहाय्याने चिखल करुन, चांगली मशागत करुन, भाताची लावणी केली जाते. त्यामुळे माणसाचे श्रम, वेळ, खर्चीक पैशाची बचत होऊन चांगले भरघोस पीक घेता येते. यावेळी ड्रम सिडर कॉप-कॅफे करीता नऊ भाताच्या जातीचे बियाणे टोकन पद्धतीने पेरण्यात आले. यात लालभात (रत्नागिरी-सात) या भाताची प्रात्यक्षिकाद्वारे पेरणी करुन घेतली.
दरम्यान कोकण कृषी विद्यापिठाचे बाळासाहेब सावंत, खारभूमी संशोधन केंद्र पनवेलचे शास्त्रज्ञ बोरसे सर, कृषी सहाय्यक अधिकारी उमेश गाताडी यासर्वांच्या मार्गदर्शनाखाली भाताच्या विविध जाती, संकरीत भाताची निर्मिती तसेच पेरभात टोकन पद्धतीची माहिती चिरनेर गावातील शेतकर्यांना देण्यात आली. या टोकन पद्धतीच्या लावणीतून भरघोस पीक बहरेल याची खात्री कृषी अधिकार्यांनी यावेळी दिली. जैविक खतांचा वापर, पाण्याचे योग्य प्रमाण आणि नियमीत देखभाल करण्याचे आवाहन या शेतकर्यांना करण्यात आले.