कर्जत शहरात पुण्यातील पेट्स फोर्स संस्थेची मोहीम
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्जत नगरपरिषदेतर्फे भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत शहरात तब्बल 150 हून अधिक कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. पुणे येथील पेट्स फोर्स संस्थेच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात आहे.
कर्जत नगरपरिषदेच्यावतीने भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केली जात आहे. कर्जत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक हैराण झाले होते. ही मोहीम यशस्वी झाल्यास कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होईल आणि कुत्रा चावल्यानंतर विषबाधेचा धोका कमी होऊ शकतो. तसेच, त्यांना अँन्टीरेबीजची लस दिली जात आहे. जेणेकरून कुत्रा चावल्यानंतर नागरिकांना विषबाधा होणार नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुत्र्यांना त्याच ठिकाणी सोडले जात आहे. त्याचवेळी ज्या भागातून त्यांना पकडण्यात आले त्याच भागात सोडले जात आहे.
कर्जत शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले नव्हते. यावर ठोस उपाययोजना राबवण्यासाठी नगरपरिषदेतर्फे वारंवार टेंडर जारी करण्यात आले होते. मात्र, एकही संस्था हे काम स्वीकारत नव्हती. अखेर मुख्याधिकारी गारवे यांच्या प्रयत्नामुळे पुणे येथील पेट्स फोर्स संस्थेने हे काम हाती घेतले. कर्जत शहरातील दहिवली परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील एका यांच्या फार्महाऊसवर ही नसबंदी मोहीम सुरू आहे. यामुळे कर्जतकरांची भविष्यात भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून सुटका होण्याची शक्यता आहे. पालिका मुख्याधिकारी आणि पालिका प्रशासक वैभव गारवे यांच्याकडून कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
पालिकेने कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर घरात पाळले जाणारे कुत्रे यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी नागरिक स्वतःहून आपल्या घरातील कुत्र्यांना या पथकाकडे देत आहेत. पालिकेने नियुक्त केलेले वाहन ही कुत्रे नेण्यासाठी शहरात फिरत असल्याने याचा फायदा नागरिक उठवत असल्याचे दिसून येत आहे.