| अलिबाग | अतुल गुळवणी (9270925201) |
प्रत्येक पिढीचा एक नायक असतो. मनाला भुरळ पाडणारी नायिका असते. क्रिकेटच्या मैदानावरील एक क्रिकेटपटू आवडत असतो. आज ज्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे, अशाच प्रत्येक व्यक्तीचा आवडता मराठी नायक मनात कायम घर करून राहिला ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी. शुक्रवारी त्यांचे निधन झाले आणि पन्नाशी गाठलेल्या प्रत्येकासमोर हमखास तो गोरा गोमटा चेहरा नजरेसमोर आला असेल. मराठी चित्रपसृष्टीतील एक दमदार नायक, सोबतीला अभिनेत्री रंजना, आशा काळे, उषा नाईक अशा अनेक दिग्गज नायिका, शिवाय सहकलावंत म्हणून अशोक सराफ, कुलदीप पवार असे दिग्गज कलावंत या पिढीच्या सर्वच कलाकारांनी मराठी रसिकांवर अधिराज्य केले.
ग्रामीण कथानक, सोबतीला दर्जेदार संगीत, सुरेल गाणी यामुळे या पिढीचे सर्वच सिनेमे हाऊसफुल्ल होत राहिले. आजही ते सिनेमे टीव्हीवर लावले तर ते पाहण्याची उत्सुकता होते. इतका मोठा प्रभाव रवींद्र महाजनी, अशोक सराफ, रंजना यांच्या पिढीने मराठी रसिकांवर पडला आहे. विशेष करून रवींद्र महाजनी, अशोक सराफ, रंजना या तिघांनी अनेक दर्जेदार सिनेमे देत आपले स्थान कायमचे कोरून ठेवले. रवींद्र महाजनी आणि रंजना यांचा लक्ष्मी सिनेमा आजही तितकाच बघावासा वाटतो. हा सिनेमा लहानपणी आम्ही सर्वांनी राशिवडेमधील बुलबुले यांच्या टुरिंग टॉकीजमध्ये पाहिला होता. तो आजही तसाच पहावा असच वाटतं.
रवींद्र महाजनी यांचे सर्वच सिनेमे प्रचंड लोकप्रिय झाले. हळदी कुंकू, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, हीच खरी दौलत, देवता असे कितीतरी सिनेमे डोळ्यासमोर येतील. या सिनेमाचे गारूड आजही मराठी रसिकांच्या मनात कायम घर करून राहिलेत. अगदी अलीकडच्या काळातील देऊळ बंदमध्येही त्यांनी खूप छान भूमिका साकारली. अनेकदा न पाहिलेल्या आवडत्या नायक, नायिकेचा चेहरा जरी नजरेसमोर आला तरी मराठी रसिक आनंदित होत असतो. त्यापैकी रवींद्र महाजनी होते.
ऐन बहराच्या काळात त्यावेळी रवींद्र महाजनी आणि अभिनेत्री रंजना यांच्या प्रेमाच्या गॉसिप ऐकायला मिळत असत.ते ऐकताना मजा यायची. आज रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूची बातमी वाचनात आली अन् आवडत्या या नायकाची अनेक रूप डोळ्यासमोर तरळून गेली. आमच्या पिढीचा नायक असा बेवारस स्थितीत आढलून आला. अरेरे…काय दुर्भाग्य…कधीकाळी मराठी सिनेमात अधिराज्य गाजविणाऱ्या आमच्या नायकाचा असा अंत व्हावा यासारखे दुसरे दुःख कोणते….रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण आदरांजली.