सुधागड बॅडमिंटन लीग जल्लोषात

अमीर, परेशच्या जोडीला विजेतेपद

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पाली क्रीडा संकुल येथे नुकतीच पार पडलेली सुधागड बॅडमिंटन लीग स्पर्धा उत्साह, शिस्त आणि खेळभावनेने भरभरून यशस्वीपणे पार पडली. सुधागड बॅडमिंटन क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा तालुक्यातील बॅडमिंटनप्रेमींसाठी एक पर्वणी ठरली. स्पर्धेत सुधागड तालुक्यातील नामवंत तसेच होतकरू खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रंगतदार सामने साकारले. उत्कृष्ट फॉर्मात खेळलेल्या अमीर पठाण आणि परेश वडके या जोडीने सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपदाचा बहुमान पटकावला. नितीश देशमुख-चिंतामणी खोडागले जोडीने उपविजेतेपद मिळवले, तर अमोल कांबळे – खानेकर गुरुजी यांनी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानले. तुषार खोडागले आणि सहकारी यांनी चौथा क्रमांक मिळवत आपले कौशल्य ठळकपणे सिद्ध केले.

तरुणांमध्ये बॅडमिंटनविषयीची आवड वाढावी आणि गुणवत्तापूर्ण खेळाडू घडावेत, या उद्देशाने क्लबने ही लीग आयोजित केली होती. या यशस्वी उपक्रमासाठी क्लबचे अध्यक्ष विनय मराठे यांच्यासह अमीर पठाण, नितेश देशमुख, परेश वडके, अमोल कांबळे, दीपक फोडे, बाला खैरे, मकरंद खोडागले, चिंतामणी खोडागले आणि संदेश सोनकर यांनी मोलाची भूमिका बजावली. सुधागड बॅडमिंटन लीगच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी खेळाडू, आयोजक व क्रीडाप्रेमींकडून क्लबचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version