राबगाव गावकर्यांचा स्तुत्य उपक्रम
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील राबगाव येथील वरदायिनी मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी श्री मारुती शेठ पडवळ संचालित स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामुळे पंचक्रोशीतील युवकांचा प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. सण व उत्सवातून अशाप्रकारे शैक्षणिक उपक्रम राबविले जातात ही बाब प्रेरणादायी ठरत असल्याचे मान्यवरांनी म्हटले.
या केंद्रात विद्यार्थ्यांसाठी विविध विषय व स्पर्धा परीक्षेची आणि अवांतर असंख्य पुस्तके मोफत वाचण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. या केंद्राचे उद्घाटन पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी विजय यादव, मारुती पडवळ, मोहन ओसवाल, सुधागड तालुका स्पर्धा परिक्षा प्रमुख प्रा.संतोष भोईर, विनोद भोईर, राबगाव ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी राबगाव गावातील अनेक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिलेच अभ्यासिका केंद्र आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये अशी अभ्यासिका सुरु करणार असल्याचे तहसीदार रायन्नावार यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल खैरे यांनी केले तसेच आभार सागर शिंदे यांनी मानले.