सुधागड तालुक्याला घरांचे नुकसान

वृद्ध महिला जखमी

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

सुधागड तालुक्यात सोमवारी (दि.13) सायंकाळी मुसळधार वादळी पावसामुळे मोठी हानी झाली. येथील वावे गावात सर्वाधिक 53 घरांचे नुकसान झाले आहे. व एक वृद्ध महिला जखमी झाली. तसेच, मजरे जांभूळपाडा येथील 3 घरांचे नुकसान झाले आहे. याबरोबरच मुळशी ठाकूरवाडी, दहिगाव, वावे तर्फे आसरे, माणगाव बुद्रुक, करचुंडे येथे देखील घरांचे कौल आणि पत्रे फुटल्याची माहिती समोर आली आहे. सोसाट्याचा वारा व पावसामुळे घरांवरील सिमेंटचे पत्रे, कौल, पाईप उडाले. ते एका घरावरुन दुसऱ्या घरावर देखील उडून पडले. तर घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. यावेळी महसूल प्रशासनाने या नुकसानाचे जलद पंचनामे करुन शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे. नायब तहसीलदार भारत फुलपगारे यांनी चिवे गावात घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन ग्रामस्तांची विचारपूस केली व पंचनाम्याच्या कामाचा आढावा घेतला.

वादळीवाऱ्यासह पावसाने झालेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासन स्तरावर लागलीच सुरु करण्यात आले आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानग्रस्तांना जिल्हा स्तरावरून लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करू.

भारत फुलपगारे,
नायब तहसीलदार, पाली-सुधागड
Exit mobile version