सुधागडात मातीचोरांचा सुळसुळाट

अनधिकृत माती उत्खननाकडे तहसीलदारांचा कानाडोळा?, सुधागड प्रेस क्लबचा आमरण उपोषणाचा इशारा


| पाली | वार्ताहर |

गेली कित्येक महिन्यांपासून सुधागड तालुक्यात मातीचोरांचा सुळसुळाट सुरू असून, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती उत्खनन होत आहे. नाममात्र स्वामीत्वधन (रॉयल्टी) काढून हजारो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. याबाबत तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या निदर्शनास आणूनदेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप सुधागड प्रेस क्लबने केला आहे. याबाबत पत्रकारांनी संबंधित तलाठी यांना विचारणा केली असता अर्वाच्च भाषेत बोलून आमच्या वरिष्ठांकडे याची तक्रार करा, असे सांगून पत्रकारांचा अवमान केला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात सुधागड प्रेस क्लब सोमवार, दि. 11 मार्च रोजी पाली तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणास बसणार असल्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी रोहा यांना नुकतेच देण्यात आले.

सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा सजातील हरणेरी हद्दीत अमित पांडे या विकासकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून मोठ्या प्रमाणात माती उत्खनन केले असून, हजारो रुपयांचा महसूल बुडवला आहे, तसेच महागाव हद्दीतील दुधनी गावातदेखील मोठ्या प्रमाणात माती उत्खनन केले असून, तेथील माती पनवेल, अलिबाग व अन्य ठिकाणी नेण्यात आली आहे, असे पत्रकारांचे म्हणणे आहे. सदर माती उत्खननाचे महसूल कार्यालयातून रॉयल्टी चलन काढले असता त्या चलनावर किती ब्रास माती उत्खनन केले आहे याची नोंद नसून, केवळ रक्कमच दाखवली जाते. यातून मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडविला दिला जात आहे. त्याचप्रमाणे सिद्धेश्वर सजामध्ये व चिवे सजातील खुरावले हद्दीतदेखील सपाटीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करून शासनाचा महसूल बुडविला गेला आहे.

याबाबत पत्रकारांनी संबंधित महसूल अधिकारी व तहसीलदार यांच्या निदर्शनास आणूनदेखील अक्षम्य दुर्लक्ष केले जात असून, याउलट पत्रकारांबरोबरच मुजोरीची भाषा केली जात आहे. याविरोधात पत्रकारांनी नुकतीच उपविभागीय अधिकारी रोहा तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेऊन तालुक्यातील होत असलेल्या अनधिकृत कामांचा पाढाच वाचला.
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सर्व कामाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले. मात्र, 11 तारखेच्या आत कोणतीही कारवाई न झाल्यास आम्ही उपोषणावर ठाम असल्याचे सुधागड प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

Exit mobile version