सुधीरकुमार यादव यांचा सेवापूर्ती कार्यक्रम

। मुरुड जंजिरा । वार्ताहर।

एलआयसी सारख्या अग्रगण्य संस्थेत विकास अधिकारी पदावर 41 वर्षे कार्यरत राहून 100 हून अधिक अभिकर्त्यांना योग्य प्रशिक्षणाद्वारे प्रोत्साहित करून ठाणे विभागात सलग 35 वर्षे पॉलिसी रक्कम, पॉलीसी संख्या आदी आयांमावर सर्वोत्तम कामगिरी करून अभिकर्त्यांसह जनसामान्यांच्या जीवितासाठी विमा कवच उपलब्ध करून त्यांना बचतीच्या माध्यमातून विम्याचे महत्व अधोरेखित करून हजारो कुटुंबियांना आर्थिक स्थैर्य दिले असे विकास अधिकारी सुधीरकुमार यादव यांच्या सन्मानार्थ सेवापूर्ती समारंभाचे शानदार आयोजन शाखा प्रबंधक नरेश स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

मुरुड, रोहा आणि सुधागड पाली या तीन तालुक्यांतील कार्यक्षेत्रातील आघाडीचे सर्व विमा सल्लागार यांनी पुढाकार घेत सुधीरकुमार यांच्या जीवनावर प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी लघुपट उपस्थितां समोर सादर करून त्यांच्या जीवनाची संघर्षयात्रा उलगडून दाखवली. या प्रसंगी त्यांच्या जीवस्य, कंठस्य मित्रांसह अनेक अभिकर्त्यांनी त्यांच्यातील अनुशासन, सचोटी, कार्यतत्परता, सातत्य, संघर्ष आणि यश या आयामांवर आपल्या मनोगतातून भावना प्रदर्शित करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सुधीर कुमार यांच्या सह संपूर्ण परिवाराचा मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन रोहा शाखेतील सर्व कर्मचारी, तसेच अन्य तालुक्यातील शुभचिंतक व अभिकर्ता बंधु भगिनींनी भव्य सत्कार केला.

सत्काराला उत्तर देतांना सुधीरकुमार यादव म्हणाले की, माझे संपूर्ण आयुष्याची गुंफण एलआयसी या तीन अक्षरांभोवती जडलेली आहे. 41 वर्षे मला या संघटनेत जे काही काम करण्याची संधी मिळाली त्यात माझ्या मित्रांसह, कार्यालयीन वरिष्ठ, पदाधिकार्‍यांचा तुम्हा अभिकर्त्यांचा वाटा आहे. मैत्रीचा ठेवा हीच माझी खरी श्रीमंती व संपत्ती आहे. यापुढेही एलआयसी च्या माध्यमातून मी सेवानिवृत्त न होता असाच कार्यरत राहील, मला सहकार्य करा असे विनम्र आवाहन त्यांनी केले.
या सुंदर सेवापूर्ती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर शेठ यांनी तर आभार प्रर्दशन प्रशांत पाटील यांनी केले .

Exit mobile version