| माणगाव | प्रतिनिधी |
शेत शिवारात सुगरण पक्ष्यांनी मोठ्या प्रमाणात घरटी बांधली असून, पक्षीप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरत आहे. जैवविविधतेने नटलेल्या रायगडमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वत्र विविध प्रकारच्या वनस्पती, गवत, फुलझाडे उगवली आहेत. शेतांमध्ये भातशेती बहरत आहे. ही भातशेती तयार होत असतानाच अनेक पक्षी शेतांच्या खाजनात माळरानांवर दिसून येत आहेत.
यातच लक्ष वेधून घेणारा इवल्याशा आकाराचा असणारा सुगरण पक्षी घरटी बांधण्याच्या कामात व्यस्त झाला असून, झाडांवर, फांद्यांमधून अनेक घरटी दिसू लागली आहेत. सुगरणीचे हे घरटे पर्यावरण प्रेमी, छायाचित्रकार व पशू पक्षी निरीक्षक, अभ्यासक यांना खुणावत आहेत. रायगडमध्ये तयार झालेल्या भात शेतीच्या खाजणाजवळ सुगरण पक्षांनी आपल्या वसाहती उभारल्या असून एका एका झाडांवर पाच ते दहा घरटी टांगलेली दिसत आहेत.
मे ते सप्टेंबर हा सुगरण पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. नराने बांधलेल्या घरट्यात मादी आपली अंडी उबवून प्रजननाचे काम पूर्ण करते. एका वेळेस एक नर कमीत कमी चार ते दहा घरटी तयार करतो. अर्धवट बांधलेल्या घरट्यात मादी यावी म्हणून सुरेल आवाज काढून मादीला आकर्षित करतो. मादी सुगरण घरट्यात येऊन निरीक्षण करते.त्या घरट्यातील एखादे घरटे आवडले तरच ती नराला दादला म्हणून निवडते. एक वेळी मादी सुगरण दोन ते चार अंडी घालते. नराने अर्धवट बांधलेले घरटे ती स्वतः व नर पूर्ण करून पिलांना त्या घरट्यात ती वाढविते, असे पक्षी निरीक्षक सांगतात.
भारताचे पहिले पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलिम अली यांनी रायगड जिल्ह्यातील किहीम येथे सुगरण पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाबद्दल अभ्यास केला होता. सुगरण पक्षाचा मे ते सप्टेंबर विणीचा हंगाम असतो, विणीच्या हंगामात नराचा रंग पिवळा होतो, एरव्ही नर व मादी दिसायला सारखी असतात, विणीच्या हंगामात नर तीन चार खोपे विणतो. त्या सर्व खोप्यामधील एक खोपा मादी पसंत करते व नंतर दोघे मिळून खोपा पूर्ण करतात. मादी दोन ते चार अंडी देते, अंडी उबवण्यापासून ते पिल्ले मोठे होण्यापर्यंत सर्व देखभाल मादी करते.
विणीच्या हंगामाकरिता सुगरण पक्षी घरटी बांधतात. हा पक्षी थव्याने राहतो. सुयोग्य व अनुकूल परिसर असल्याने मोठ्या प्रमाणात सुगरण पक्षाची घरटी दिसत आहेत. जैवविविधता व वन्य पक्ष्यांसाठी व अभ्यासकांसाठी ही चांगली बाब आहे.
राम मुंढे, पशु-पक्षी निरीक्षक